सुहास सरदेशमुख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घनसावंगी येथील मराठवाडा साहित्य संमलेनाचे उद्घाटन व समारोपाचे कार्यक्रम शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या राजकारणाला पुरक ठरावे अशी व्यूहरचना मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने केली असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.
संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्ती असू नयेत यासाठी उस्मानाबाद येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वेळी काम करणारे मराठवाडा साहित्य परिषदेच्या कारभारी मंडळींनी घनसावंगी येथील मराठवाडा साहित्य संमेलनात ‘ राजकारण आणि समाजकारण, हेच साहित्य मूल्य निर्मितीला प्रोत्साहन देणारे असते’ अशी भूमिका व्यक्त् करत शिवसेना नेतृत्वाला पोषक ठरेल अशी भूमिका व्यक्त केली.

घनसावंगी साहित्य समेलनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. संमेलनाच्या समारोपास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड्. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. घनसावंगी हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते राजेश टोपे यांचा मतदारसंघ असून शिवसेनेचे शिवाजी चोथे हे मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यामुळे सेना नेत्यांच्या मांदियाळीत घनसावंगीच्या संमेलनास सुरूवात झाली.

हेही वाचा: गडकरींबरोबरच देवेंद्र फडणवीसही आता रस्ता निर्मितीचे शिल्पकार

शिवाजी चोथे शिवसेनेचे माजी आमदार असून त्यांच्या स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने घनसावंगीमध्ये संमेलन घेण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेकडे अर्ज केला हाेता. मराठवाडा साहित्य परिषद ही संस्थाच राजकीय कारणासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था होती. म्हणून या संस्थेला राजकारण वर्ज्य नाही किंबहुना राजकारण आणि समाजकारणच साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देणारे असते, अशी भूमिका कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केली. हे साहित्य संमेलन घेण्यासाठी लागणारा पैसा माजी आमदार शिवाजीराव चोथे यांचा आहे. त्यांना कोणी ‘ खोके ’ दिले नाहीत, असा राजकीय संदर्भही ठाले पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ‘मिंधे सेना’ ‘ खोके’ असे राजकीय संदर्भ वापरत टोलेबाजी करता आली. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची राजकीय चर्चा सुरू झाल्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर दोन्ही नेत्यांच्या येण्याचे राजकीय संदर्भ तपासले जात आहेत.

हेही वाचा: कैलास पाटील : शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांच्या बरोबरीने प्रबोधनकारांच्या प्रतिमांचेही पूजनही या संमेलनात आवर्जून करण्यात आले. एखाद्या राजकीय व्यक्तीची व्यासपीठावर उद्घाटक, अध्यक्ष किंवा अन्य कोणती भूमिका नसेल तर त्यांनी मंचावर येऊ नये, असे मसापकडून आवर्जून सांगितले जायचे. मात्र, घनसावंगी येथील संमेलनातील व्यासपीठावर अनिल परब, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, विनोद घोसाळकर यासह शिवसेनेचे बहुतांश नेते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घटनाच्या कार्यक्रमावर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या पक्षाची छाप दिसून येत होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening and closing programs of the marathwada literary conference were designed to help shivsena uddhav balasaheb thackeray politics print politics news tmb 01