रशिया आणि युक्रेनच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने जी भूमिका घेतली आहे, त्याला देशातील विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याचे राहुल गांधी यांनी शुक्रवारी (दि. ८ सप्टेंबर) ब्रुसेल्स, बेल्जियम येथे बोलताना सांगितले. पाश्चिमात्य देशांनी निर्बंध घातल्यानंतरही भारत अजूनही रशियाकडून इंधन विकत घेणार का? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला होता. यावर बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, भारत हा मोठा देश आहे आणि भारत हा जगातील कोणत्याही देशासोबत संबंध ठेवू शकतो. भारताचे रशियाशी संबंध असणे ही सामान्य आणि स्वाभाविक गोष्ट आहे, यावर विरोधकांचा कोणताही वेगळा विचार नाही, अशी स्पष्ट भूमिका राहुल गांधी यांनी परदेशात बोलत असताना मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रशिया-युक्रेन युद्धावरील मोदी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यानंतर राहुल गांधी यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. “माझा विश्वास आहे की, भारताने आपल्या सार्वभौम आणि आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य देऊन शांततेचे आवाहन केले आहे”, अशी भूमिका मनमोहन सिंग यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत मांडली.

खरगे यांना सहभोजनासाठी आमंत्रण का नाही?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना जी-२० शिखर परिषदेनिमित्त आयोजित केलेल्या सहभोजनास आमंत्रित केले नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावर गांधी म्हणाले की, देशाच्या ६० टक्के जनतेमधून जे नेते येतात, त्यांची पर्वा भाजपा करत नाही. यावर आणखीही विचार करण्यासारख्या अनेक बाबी आहेत.

कलम ३७०

संविधानातील कलम ३७० बाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यासंबंधी ठरावदेखील झालेला आहे. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तिला स्वतःचा आवाज आहे आणि त्याला व्यक्त होण्याची मुभा आहे. याची खात्री करण्याचे आमचे काम आहे. काश्मीरचा विकास व्हावा, काश्मीर प्रगतीपथावर राहावा आणि तिथे शांतता नांदावी, असे आम्हाला प्रकर्षाने वाटते.

राहुल गांधी एक आठवड्याच्या युरोप दौऱ्यावर गेले आहेत. तिथे ते भारतीय नागरिकांच्या भेटी-गाठी घेतील आणि युरोपियन युनियनच्या विधिज्ञांना भेटतील. हा दौरा इंडियन ओव्हरसिस काँग्रेसने आयोजित केला आहे.

इंडिया दॅट इज भारत, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे

सध्या भारत विरुद्ध इंडिया असा वाद सुरू आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, संविधानात अनुच्छेद एक मध्ये ‘इंडिया दॅट इज भारत’ अशी तरतूद करण्यात आली आहे आणि माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. आमच्या आघाडीवरून लक्ष वळविण्यासाठी त्यांच्याकडून ही अस्वस्थ प्रतिक्रिया उमटली असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition agrees with indias position on russia says rahul gandhi in brussels kvg
Show comments