विरोधकांनी २६ पक्षांना एकत्र करून ‘इंडिया’ नावाची आघाडी स्थापन केली. त्यानंतर भाजपानेही एनडीएत प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. एनडीएमध्ये उत्साही वातावरण टिकून राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए युतीमधील खासदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. विरोधकांच्या आणि आपल्या आघाडीमध्ये फरक असल्याचे मोदींनी खासदारांना सांगितले. आपली युती होण्यास ‘कारण’ होते, तर विरोधक ‘स्वार्थासाठी’ एकत्र आले असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. सूत्रांनी माहिती दिली की, इंडिया आघाडीकडे पाहून खासदारांनी विचलित होऊ नये, अशी सूचना मोदी यांनी दिली आहे. लोक अजूनही या पक्षांनी (विरोधक) केलेल्या जुन्या भ्रष्टाचार प्रकरणांना विसरलेले नाहीत. त्यांच्या जुन्या पापांमुळे लोक अजूनही त्यांचा द्वेष करतात, असेही मोदी यांनी सांगितले.
सोमवारी (दि. ३१ जुलै) पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र सदनमध्ये एनडीएच्या ४५ खासदारांची पहिली बैठक घेतली. या बैठकीला पश्चिम उत्तर प्रदेश आणि कानपूर-बुंदेलखंड क्षेत्रातील खासदार उपस्थित होते. मोदी यांनी यावेळी विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले. बिहार विधानसभा निवडणुकीत २०२० साली जनता दल (यू) पेक्षा भाजपाच्या जास्त जागा येऊनही नितीश कुमार यांना मुख्यंमत्रीपद का दिले? तसेच पंजाबमध्ये अकाली दलाच्या सरकारला पाठिंबा दिला असताना भाजपाने उपमुख्यमंत्रीपद का घेतले नाही? यामागची कारणीमीमांसा सांगून मोदी यांनी युतीधर्माचे दाखले दिले. तसेच खासदारांनी इतरांना सोबत घेऊन काम करत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एनडीएचेच सरकार येईल, असे प्रयत्न करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.
हे वाचा >> विरोधकांची तयारी पाहता भाजपाने बदलली रणनीती; आता एनडीएतील मित्रपक्षांना एकत्र करण्याची तयारी सुरू
भाजपाने एनडीएच्या खासदारांना क्षेत्रानुसार विभागले असून ४० खासदारांचा एक गट तयार केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान प्रत्येक गटाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्टपर्यंत रोज बोलणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदारांनी मतदारसंघात जाऊन काम करावे, स्थानिक मुद्द्यांवर काम करावे आणि लोकांमध्ये जाऊन सरकारच्या योजनांची माहिती द्यावी आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विषयांवर भाष्य करणे टाळावे, असे मार्गदर्शन देत मोदींनी खासदारांना प्रोत्साहन दिले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, छोट्यातला छोटा विषयदेखील निवडणुकीचा नूर पालटू शकतो. अशा विषयांना सोशल मीडियाच्या आधारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. यावेळी मोदी यांनी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ क्लिपचे उदाहरण दिले. या व्हिडीओमध्ये एक महिला म्हणते, मला किती मुले आहेत याची चिंता नाही. कारण माझा एक मुलगा (पंतप्रधान मोदी) दिल्लीत बसला असून तो आमच्या सर्वांची काळजी घेत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मते, सदर व्हिडीओ उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महत्त्वपूर्ण ठरला. या व्हिडीओमुळे भाजपाची पुन्हा एकदा उत्तराखंडमध्ये सत्ता आली. खासदारांनी लोकांमध्ये एक सकारात्मक संदेश घेऊन जावे आणि जास्तीत जास्त वेळ लोकांमध्ये घालवावा, असेही मोदी यांनी सांगितले.
आज सोमवारी (दि. १ ऑगस्ट) पंतप्रधान मोदी पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमधील खासदारांची संसदेच्या इमारतीत बैठक घेणार आहेत. तर ८ ऑगस्ट रोजी महराष्ट्र, राजस्थान आणि गोवा राज्यातील खासदारांची बैठक संपन्न होणार आहे.