“विजेता दुसऱ्या स्थानी असतो”
१९८९ साली लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांनी हे विधान केले होते. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने संसदेतील दोन जागांवरून तब्बल ८५ जागा पटकावण्याचा विक्रम केला होता. हा तोच काळ होता, जेव्हा भाजपा राष्ट्रीय पक्ष म्हणून राजकीय पटलावर उदयास येऊ लागला होता. काल सोमवारी (२४ जून) १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता. या अधिवेशनामध्ये विरोधकांच्या देहबोलीमध्ये आत्मविश्वास होता, चेहऱ्यावर विजयाचे तेज होते. लालकृष्ण आडवाणी यांनी केलेल्या त्याच विधानाची लकाकी विरोधकांच्या हालचालींमधून स्पष्ट जाणवत होती. जवळपास एक दशकानंतर देशातील विरोधी पक्षांना सत्ताधाऱ्यांशी तुल्यबळाने दोन हात करता येतील इतक्या जागा मिळाल्या आहेत. मागील दोन्ही लोकसभांमध्ये विरोधक सभागृहातील फक्त पहिल्या दोन ओळीच व्यापू शकायचे; आता तेच विरोधक जवळपास एक-तृतियांश सभागृह व्यापताना दिसून आले. सारांश एकच- विरोधकांचे बळ आणि आत्मविश्वास वाढला आहे.

हेही वाचा : विश्लेषण : इंदिरा गांधींनी राबवलेली आणीबाणी नेमकी काय होती? कारणे कोणती? परिणाम काय?

गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सत्ताधारी भाजपाने संसदेची जुनी इमारत सोडून नव्या इमारतीमध्ये प्रवेश करताना ‘जय श्रीराम’ आणि ‘अब की बार, चारसौ पार’ अशा घोषणा दिल्या होत्या. तेव्हा भाजपाचा जोर काही औरच होता. मात्र, काल नव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सदस्यत्वाची शपथ घ्यायला उठले तेव्हा ‘मोदी, मोदी’चा उद्घोष फार काळ चालला नाही. त्यामध्ये तेवढा जोरही नव्हता. दुसऱ्या बाजूला आपल्या हातात संविधानाची प्रत घेऊन योग्य संदेश देण्यात विरोधक यशस्वी ठरल्याचे दिसून आले. किंबहुना, नरेंद्र मोदी शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा राहुल गांधींसहित सगळ्या विरोधकांनी त्यांना राज्यघटनेची प्रत दाखवून प्रतीकात्मक प्रतिक्रिया दिली; जी प्रचंड बोलकी होती. एककीडे संसदेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची लोकसभेतील सदस्यसंख्या ५२ वरून ९९ वर पोहोचली आहे; तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील प्रादेशिक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीनेही दमदार कामगिरी करीत भाजपाला धूळ चारली आहे. उत्तर प्रदेश हा भाजपाचा गड मानला जातो. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा पार पाडून मोदींनी तिसऱ्या कार्यकाळाचा पाया रचल्याचे बोलले जात होते. मात्र, लोकसभेच्या निकालातून जे चित्र उभे राहिले, ते भाजपासाठी प्रचंड धक्कादायक होते. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टीने पाचवरून ३७ जागांवर मजल मारली आहे. त्याशिवाय अयोध्येमध्ये (फैजाबाद लोकसभा मतदारसंघ) समाजवादी पार्टीचे ७९ वर्षीय उमेदवार अवधेश प्रसाद यांनी भाजपा उमेदवाराचा केलेला पराभव नक्कीच जखमेवर मीठ चोळणारा ठरला. काल संसदेच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे दोघेही प्रमुख विरोधी नेते पहिल्या बाकावर बसले होते. त्या दोघांनी आपल्यामध्ये अयोध्या काबीज करणाऱ्या अवधेश प्रसाद यांना बसवले होते. हे चित्र पुरेसे बोलके होते.

मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करणारा भाजपा आता १८ व्या लोकसभेमध्ये अल्पमतात आला आहे. भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी एनडीएतील घटक पक्षांच्या कुबड्या गरजेच्या आहेत. दुसऱ्या बाजूला विरोधकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. काल काँग्रेस, द्रमुक व तृणमूल काँग्रेस या पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या प्रांगणात प्रतीकात्मक आंदोलन केले. सगळ्यांच्या हातात संविधानाच्या लाल मुखपृष्ठ असलेल्या प्रती होत्या. ज्या ठिकाणी महात्मा गांधींचा पुतळा होता, त्याच ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. हा पुतळा हलविण्यात आल्यानेही विरोधकांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर विरोधक शपथविधीसाठी सभागृहात गेले. काही मिनिटांनंतर अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील खासदारांनी सभागृहात मोठ्या थाटात प्रवेश केला. त्यांच्या गळ्यात लाल रंगाचे उपरणे होते; तर हातात लाल मुखपृष्ठ असलेल्या राज्यघटनेची प्रत होती. येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या सभागृहामधील वातावरण काय असणार आहे, याची चुणूक दाखविणारे एकंदर चित्र होते. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे शपथ घेत असताना विरोधकांनी त्यांना राज्यघटनेची प्रत दाखवली. पंतप्रधान मोदी शपथ घेत असताना विरोधकांनी ‘भारतीय राज्यघटनेचा विजय असो’ आणि ‘संविधान बचाव’च्या घोषणा दिल्या. भाजपा ‘चारसौपार’ जागा मिळवून पुन्हा सत्तास्थानी आला, तर तो देशाची राज्यघटना बदलेल, हा विरोधकांच्या लोकसभेतील प्रचाराचा मुख्य मुद्दा होता. त्यामुळे त्या मुद्द्याला धरूनच संसदेमध्ये विरोधकांची चाल दिसून आली. नीट आणि नेट या परीक्षांत झालेल्या गोंधळावरूनही विरोधकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान शपथ घेताना ‘नीट, नीट’ आणि ‘शेम, शेम’च्या घोषणा देण्यात आल्या. हा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचे विरोधकांनी आधीच स्पष्ट केले होते.

हेही वाचा : जेव्हा ‘नसबंदी’ ठरला होता आणीबाणीसाठी समानार्थी शब्द; संजय गांधींनी कशी राबवली होती ही वादग्रस्त मोहिम?

सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीपासूनच विरोधक आक्रमक पवित्र्यात दिसून आले. हंगामी अध्यक्षपदाच्या निवडीवरूनही विरोधकांमध्ये रोष आहे. भाजपाचे सात वेळचे खासदार भर्तृहरी महताब यांच्या गळ्यात हंगामी अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे. मात्र, संसदीय कार्यप्रणालीनुसार सर्वांत अनुभवी खासदाराला हे पद दिले जाते. त्यानुसार काँग्रेसचे आठ वेळचे खासदार के. सुरेश यासाठी पात्र ठरतात, असा विरोधकांचा दावा आहे. जेव्हा हंगामी अध्यक्ष महताब यांनी शपथविधी पार पाडण्याकरिता आपल्या साह्यासाठी काँग्रेसचे के. सुरेश, द्रमुकचे टी. आर. बाळू व तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंधोपाध्याय यांना निमंत्रित केले तेव्हा त्यांच्यापैकी कुणीही पुढे गेले नाही. के. सुरेश यांना हंगामी अध्यक्षपद न दिल्याचा निषेध म्हणून विरोधकांनी हा निर्णय घेतला. के. सुरेश हा मुद्दा रेकॉर्डवर ठेवण्यासाठी उभे राहिले; पण त्यास सभापतींनी परवानगी दिली नाही. बऱ्यापैकी सर्वच विरोधी खासदारांनी शपथ घेताना राज्यघटनेची प्रत आपल्या हातात धरली होती. पहिल्या दिवशी काही मुद्द्यांवरून हास्यकल्लोळही पाहायला मिळाला. जेडीयू पक्षाचे खासदार राजीव रंजन शपथ घ्यायला उठले तेव्हा तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी ‘दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा’ हे गाणे गाताना दिसून आले. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू हा पक्ष आधी इंडिया आघाडीत होता. निवडणुकीपूर्वी धक्का देत त्यांनी एनडीए आघाडीत जाणे पसंत केले होते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह शपथ घेण्यासाठी पुढे आले तेव्हा बॅनर्जी म्हणाले, “तुमच्यामुळे आम्हाला खूप मते मिळाली. धन्यवाद.” कालच्या शपथविधीमध्ये खासदारांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत, तेलुगू, डोगरी, बांगला, आसामी, ओडिया, गुजराती व मल्याळम अशा विविध भाषांमधून शपथ घेतली. बऱ्याच खासदारांनी त्यांच्या संस्कृतीचे प्रदर्शन करणारा पेहराव केला होता. आसामी खासदारांनी पांढरा आणि लाल रंगाचा गमछा परिधान केला होता. तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांनी पारंपरिक बंगाली धोती घातली होती. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल लाल आणि काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसून आल्या. त्यावर द्रमुकच्या खासदार एम. कनिमोझी व थमिझाची सुमाथी यांनी अशी टिप्पणी केली की, त्यांच्या मनात द्रमुकच आहे. लाल आणि काळा हे द्रमुकच्या निशाणीमधील रंग आहेत. सकाळी ११ वाजण्याच्या आधीच अनेक खासदार संसदेमध्ये उपस्थित झाले होते. बरेचसे नवे खासदार त्यांच्या कुटुंबीयांबरोबर छायाचित्रे काढण्यात व्यग्र होते. ते आपल्या कुटुंबीयांची इतर खासदारांना ओळख करून देत होते.