लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. गोयल यांनी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या काही दिवसांपूर्वीच शुक्रवारी निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक १५ मार्च २०२४ रोजी होणार असून, त्या बैठकीत नवीन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी नावे निश्चित केली जाणार आहेत. निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे गेल्या महिन्यात निवृत्त झाल्याने आणि अरुण गोयल यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे निवडणूक आयुक्तांची दोन पदे रिक्त झाली आहेत.
दोन निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील निवड समितीची गुरुवारी बैठक होणार आहे. बैठकीपूर्वी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि तीन सदस्यीय पॅनेलमधील विरोधी सदस्य यांनी मोदी सरकारला पत्र लिहून शॉर्टलिस्ट केलेल्या व्यक्तींच्या प्रोफाइलसह डॉसियरची मागणी केली आहे. डॉसियर म्हणजे कागदपत्रांचा एक संग्रह असतो, ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट घटनेबद्दल किंवा एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा गुप्तहेरसारख्या व्यक्तीबद्दल माहिती असते.
बैठकीपूर्वी निवडणूक आयुक्तांसाठी निवडलेली नावे पाठवा
विधी विभाग आणि कायदेशीर व्यवहार विभाग सचिव राजीव मणी, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालय यांना लिहिलेल्या पत्रात अधीर रंजन चौधरी यांनी मुख्य माहिती आयुक्त आणि त्यांच्या निवडीसंदर्भात सरकारद्वारे अवलंबली जाणारी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयुक्त निवडीची नवी पद्धत सूचवली आहे. तसेच केंद्रातील मोदी सरकारला हीच पद्धत अवलंबण्यास सांगितले आहे. लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते म्हणून अधीर रंजन हे केंद्रीय माहिती आयोग( CIC) आणि केंद्रीय दक्षता आयोगा (CVC) ची निवड करणाऱ्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे सदस्यदेखील आहेत.
हेही वाचाः शरद पवारांचे बेरजेचे राजकारण बारामतीत अजितदादांसाठी अडचणीचे
अधीर रंजन चौधरी यांनी लिहिले, “शोध समितीने निवडलेल्या व्यक्तींची बायो प्रोफाइल निवड समितीच्या बैठकीपूर्वी सगळ्यांसमक्ष ठेवणे आवश्यक असेल. त्यामुळे या प्रकरणात तर्कशुद्ध निर्णय घेणे सोपे जाणार आहे. “मी विनंती करेन की, नियुक्तीसाठी निवडलेल्या व्यक्तींचे बायो प्रोफाइल असलेले डॉसियर बैठकीपूर्वी सदस्यांना उपलब्ध करून द्यावेत.” या समितीमध्ये पंतप्रधान, पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्ष नेता किंवा लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचा समावेश असतो.
हेही वाचाः मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा, तर नायब सिंह सैनी नवे मुख्यमंत्री; हरियाणात नक्की काय घडतंय?
दोन निवडणूक आयुक्तांची निवड करावी लागणार
फेब्रुवारीमध्ये अनुप चंद्र पांडे यांची निवृत्ती आणि गेल्या शनिवारी अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे निर्माण झालेल्या रिक्त जागा भरण्यासाठी दोन निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी गुरुवारी पॅनेलची बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन नवीन निवडणूक आयुक्तांची लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे, जे लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासोबत सामील होतील.