छत्रपती संभाजीनगर: बदलत्या भूमिकेत ठाकरे गटाचा उमेदवार कोण या प्रश्नावर सुरू झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ‘ मी पक्षाकडे उमेदवारी मिळावी अशी विनंती केलेली नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ही जागा लढवा आदेश दिले तर निवडणुकीच्या रिंगणात उतरू’ असे भूमिका स्पष्ट केली. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे की दानवे अशी चर्चा सुरू होती. त्याच वेळी शिवसेनेच्या या जागेवर महाविकास आघाडीतील कॉंग्रेसनेही दावा केला आहे.
महाविकास आघाडीचे लोकसभा निडणुकीबाबतचे जागावाटप २९ तारखपर्यंत होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर जागावाटपाचे सूत्र जाहीर होईल, असे महाविकास आघाडीतील नेत्याने ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
शिवसेनेमध्ये एवढे दिवस ‘ आवाज कुणाचा’ ही घोषणा जेवढी लोकप्रिय तेवढीच ‘ पन्नास खोके’ ही घोषणाही शिवसैनिकमध्ये रुजली. ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ हेही म्हणून झाले. सहानुभूतीचा जोर ओसरला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बदलत्या भूमिकेनुसार कार्यकर्त्यांची उठबसही आता बदलू लागली आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडे आता मुस्लिम कार्यकर्त्यांचा राबता वाढू लागला आहे. मात्र, बदलत जाणाऱ्या भूमिकाशी जळुवून घेणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर अद्यापि लोकसभेचा उमेदवार कोण याचे गणित काही उलगडत नसल्याने संभ्रम कायम आहे. छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यास चार वेळा औरंगाबादचे खासदार राहिलेले नेते चंद्रकांत खैरे यांनी दावा केला आहे.
हेही वाचा… सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाल्यास काँग्रेसकडे पर्याय काय ?
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकांपेक्षाही प्रबोधनकारांच्या भूमिका शिवसैनिकांपर्यंत तातडीने पोहचवत उद्धव ठाकरे गट नवी मांडणी करत आहे. प्रबोधनकार आणि प्रागतिक भूमिका मांडणाऱ्या नेत्यांमध्ये सुषमा अंधारे यांचा समावेश प्रामुख्याने केला जातो. ‘ जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना मारला गेलेला औरंगजेब नावाचा सैनिक आम्हाला हवा आहे. ते आमचे हिंदूत्व आहे, अशी नवी भूमिका उद्धव ठाकरे यांनी भाषणांमधून मांडली. भाजपसमोर आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी आव्हान उभे केल्याचा संदेश गेल्यानंतर औरंगाबादमधील शिवसेना नेत्यांकडे ‘ मुस्लिम’ व्यक्तींचा राबता वाढला आहे. चंद्रकांत खैरे खासदार असतानाही त्यांचा मुस्लिम मतदारांशी चांगला संपर्क होता. आता मात्र त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आपल्या हिंदूत्वाच्या भूमिकेपासून आपण हटलो नाही, असा दावा खैरे करत असतात. ‘ आम्ही हिंदुत्त्वासाठी जेवढे काम केले तेवढे कोणीच केले नाही. आजही उद्धव ठाकरे यांचे समर्थकच आपल्यासाठी काम करतात, हे सर्व हिंदू जनतेला माहीत आहे. त्यामुळे आमच्या हिंदुत्त्वावर कोणी प्रश्नचिन्ह लावू शकत नाही’ असेही शिवसेना नेते सांगतात.
दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हाभर कार्यकर्ते घडविणारे अंबादास दानवे यांनी आपण लोकसभेसाठी उमेदवारी मागितलेली नाही. मात्र, ही जागा लढावा असा पक्ष आदेश आला तर मैदानात उतरू असे सांगितले.