मुंबई : बदलापूर येथील शाळेत विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी राज्यातील महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी सकाळी विविध ठिकाणी तोंडावर काळी पट्टी बांधून एका तासाचे निषेध आंदोलन केले.

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबईत धारावी व नागपाडा जंक्शन येथे, आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वात परळ येथे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सकाळी १० ते ११ दरम्यान मूक आंदोलने झाली. सकाळपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे भर पावसात आंदोलने पार पडली. धारावी येथे आंदोलनात खासदार वर्षा गायकवाड यांनी ‘मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी केली.

नागपाडा जंक्शन येथील निषेध आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल सहभागी झाले होते. परळ येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार डॉ. मनहास, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकिम यांनी भाग घेतला. चेंबूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे काँग्रेसचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राला लाडकी बहीण योजना नाही तर सुरक्षित बहीण योजना पाहिजे, असे फलक निदर्शकाच्या हाती होते.

हेही वाचा >>> विरोधकांचे आंदोलन; भाजपचा जागर; आरोपीला पाठीशी घालण्याचे काम – ठाकरे

मुसळधार पाऊस, जोरदार घोषणाबाजी अन् तीव्र निदर्शने

मुंबई : बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी शिवसेना भवनजवळ निदर्शने केली. सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मुसळधार पावसातही कार्यकर्त्यांनी हातात छत्र्या घेऊन, तर काही कार्यकर्ते धो – धो पावसात भिजत घोषणाबाजी करत होते.

बदलापुरातील घटनेबाबत महाविकास आघाडीतर्फे राज्यभर मूक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार दादरमधील शिवसेना भवनजवळ शनिवारी आंदोलन करण्यात आले. मुंबईतील विविध परिसरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी दहा वाजल्यापासूनच शिवसेना भवनच्या परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. डोक्याला काळ्या फिती बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन धो-धो पावसात पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, शिवसेनेचे माजी महापौर, आमदार, खासदार, नेते, शाखाप्रमुख व कार्यकर्ते हे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून आंदोलनात सहभाग घेतला आणि निषेध नोंदवला. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपापल्या विभागांत स्वाक्षरी मोहीम राबविण्याचे उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्धव ठाकरे संबोधित करत असताना त्यांच्या प्रत्येक आवाहनाला कार्यकर्त्यांकडून जोरदारपणे प्रतिसाद दिला जात होता.

चिमुरडीला न्याय द्या; नाहीतर खुर्च्या खाली करा, नराधमांना फाशी झालीच पाहिजे, मिंधे सरकार हाय हाय, या सरकारचे करायचे काय; खाली डोके वर पाय, नराधमांवर पांघरुण घालणाऱ्या विकृत सरकारचा निषेध आदी घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या. तसेच महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या ‘शक्ती’ कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, ही प्रमुख मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती. आम्हाला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे पंधराशे रुपये नको; परंतु लेकीबाळींना सुरक्षा द्या अशा भावना महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. लेकीबाळींवर अत्याचार करणाऱ्यांचा; त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा; कायदा सुव्यवस्थेची वाट लावणाऱ्यांचा: असंवेदनशील सरकारचा निषेध… असा मजकूर असलेले फलक आणि गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या अत्याचारांची यादी असलेले फलक शिवसेना भवन परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते.

Story img Loader