कर्नाटकमध्ये फॉक्सकॉनचा प्रकल्प येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली होती. ही घोषणा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. कर्नाटक सरकारसोबत कोणताही करार झाला नाही असे फॉक्सकॉनकडून जाहीर केल्यानंतर सदर टीका होत आहे. तसेच जेव्हा गुंतवणूकदार राज्यात येतात, तेव्हा त्यांच्यासोबत व्यापार करताना जरा सांभाळून व्यापार करावा, असा उपरोधिक सल्ला देखील काँग्रेसने बोम्मई यांना दिला आहे. कर्नाटक सरकारने सांगितले की, फॉक्सकॉनसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे आणि लवकरच गुंतवणुकीचे सर्व तपशील जाहीर केले जातील.
कर्नाटकच्या उद्योग आणि वाणिज्य विभागाच्या आयुक्त गुंजन कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, फॉक्सकॉन ही कंपनी सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपनी असल्यामुळे त्यांच्या संचालक मंडळाच्या मंजुरीनंतरच कंपनीकडून गुंतवणुकीबाबतची अधिकृत घोषणा होईल. यासाठी साधारण १२ ते १४ महिन्यांचा काळ जाऊ शकतो, असा अंदाज आहे. या सामंजस्य कराराला अंतिम स्वरुप देण्यासाठी कर्नाटक सरकार फॉक्सकॉन प्रशासनाच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले की, फॉक्सकॉनने आयफोन उत्पादन युनिट बंगळुरू येथे थाटण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. मुख्यमंत्री बोम्मई, कर्नाटकचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण आणि फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांची शुक्रवारी भेट झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बोम्मई यांनी ट्विट करत माहिती दिली की, फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर राज्यात सर्वात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी मोठा करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून १ लाख रोजगार निर्माण होईल. या युनिटसाठी बंगळुरू विमानतळानजीकची ३०० एकरची जागा देण्यात येणार आहे. फॉक्सकॉनला आम्ही अनुकूल वातावरण प्रदान करू.
बोम्मई यांनी आणखी एक ट्विट केले. त्यात त्यांनी लिहिले, “ॲपल फोन आता आपल्या राज्यात निर्माण केले जातील. एक लाख रोजगार निर्माण करण्याव्यतिरिक्त कर्नाटकसाठी खूप मोठी संधी यामुळे चालून आली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली २०२५ पर्यंत आम्ही भारताला ५ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी आपला वाटा उचलू.”
फॉक्सकॉनकडून या कराराविषयी नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री बोम्मईवर जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप केला. तसेच त्यांनी जनतेची माफी मागावी, अशीही मागणी केली. “बोम्मई यांनी फॉक्सकॉनशी आयफोन निर्मितीचा केलेला करार आणि त्यातून निर्माण होणारे एक लाख रोजगार, हे खोटारडेपणाचे सर्वात मोठे उदाहरण आहे.” कर्नाटक सरकारने ४० टक्के कमिशन मागितले असावे, त्यामुळेच कदाचित हा करार रद्द झाला, असा टोलाही सुरजेवाला यांनी कर्नाटकला लगावला.
काँग्रेस नेते आणि माजी माहिती व तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे म्हणाले की, बोम्मई हे कर्नाटकातील लोकांची दिशाभूल करत आहेत. फॉक्सकॉनसारख्या प्रतिष्ठित गुंतवणुकीला प्रसिद्धी स्टंट करुन ते धोक्यात का आणू पाहत आहेत? करारावर स्वाक्षरी होईपर्यंत बहुतेक गुंतवणूकदार हे गुप्ततेला प्राधान्य देतात. मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे ट्विट खर्गे यांनी केले आहे.
तर माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही भाजपावर टीका करण्याची संधी साधली. ते म्हणाले, ‘अधिक प्रसिद्धी आणि शून्य निकाल’ हे या सरकारचे धोरण आहे. बोम्मई आणि त्यांचे दोन मंत्री यांना फॉक्सकॉनने राज्याशी करार केला असे सांगून फुकट प्रसिद्धी कमवायची होती. या मंत्र्यांनी माध्यमांसमोर काही दस्तऐवज दाखविले. तथापि फॉक्सकॉनने मात्र तैवानमध्ये जाहीर केले की कर्नाटक सरकारसोबत कोणताही निर्णायक करार झालेला नाही. मग हा करार होता की केवळ प्रसिद्धीसाठी केलेला खेळ? असाही प्रश्न कुमारस्वामी यांनी उपस्थित केला.