देशात सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या राज्यात भाजपाला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. ‘आप’चे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या राज्यात झंझावाती प्रचार करताना दिसत आहे. त्यांच्यासोबतच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानदेखील गुजरात पालथा घालत पक्षासाठी प्रचार करत आहे. ते केजरीवालांनंतर पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. जवळपास प्रत्येक आठवड्यात ते गुजरातमध्ये प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे पंजाबमधील गैरहजेरीवरुन येथील विरोधी पक्षांकडून मान यांच्यावर टीका केली जात आहे.
भगवंत मान यांच्या गुजरातमधील स्टार प्रचारकाच्या भूमिकेवरून काँग्रेसने आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. मान हे अकार्यक्षम मुख्यमंत्री असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रताप बाजवा यांनी केला आहे. मान यांनी पंजाबला देवाच्या आणि नोकरशाहांच्या भरवश्यावर सोडल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे.
गुजरातमध्ये दिवसाला दहा सभा घेत मान मतदारांना भुरळ घालत आहेत. ‘एक मोको केजरीवालने’ हा नारा देत मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न ‘आप’कडून केला जात आहे. गुजरातच्या गांधीधाम, लखपत, वडोदरा आणि सुरतमध्ये जवळपास ५० हजार शीख राहतात. याच भागात मान यांच्याकडून सर्वाधिक प्रचार करण्यात येत आहे. भावनगर, अहमदाबाद, जामनगर, वलसाद, नवसारी आणि वापीमध्येही शीख बांधवांचं वास्तव्य आहे. दरम्यान, गुजरातमधील शीख आपला नव्हे तर भाजपाला पाठिंबा देत असल्याचे अहमदाबादमधील गुरुद्वारा गोबिंदधामचे माजी अध्यक्ष जसबीर माखीजा यांनी म्हटले आहे.
“मान यांचं पक्षात महत्त्वाचं स्थान आहे. केजरीवाल यांच्यानंतर ते पक्षाचे ब्रँड अम्बेसिडर आहेत. मान यांनी पंजाबमध्ये सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. जुन्या पेन्शनच्या घोषणेसह नागरिकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली आहे. त्यांचे हे काम मतदारांना आकर्षित करत आहे”, असे आपच्या नेत्याने म्हटले आहे. भाषेचा अडथळा असतानाही मतदारांशी संवाद साधण्याची कला मान यांना अवगत आहे. त्यांच्या भाषणांचा हिंदी अनुवाददेखील केला जात आहे.
गुजरातमध्ये इसुदान गढवी ‘आप’चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ; राज्यात इतर मागासवर्गीयांची ४८ टक्के मते
दरम्यान, आपकडून इसूदान गढवी यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. भगवंत मान यांच्याकडून कच्छ, जुनागढ, सुरेंद्रनगर, सांबरकाठा, दाहोड, वडोदरा, वलसाद, सुरत, पंचमहाल, बनासकांठा, नवसारी आणि भरुच जिल्ह्यांमध्ये प्रचार करण्यात येत आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच त्यांनी २००२ च्या दंगलींनी सर्वाधिक प्रभावित झालेल्या अहमदाबाद शहरातील मुस्लीम बहुल भागात रोड शोदेखील केला होता.