२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधकांच्या या आघाडीला ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ अर्थात INDIA असे नाव देण्यात आले आहे. या आघाडीमध्ये एकूण २६ पक्ष आहेत. दरम्यान विरोधकांच्या या आघाडीच्या नावाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. आज INDIA या नावाला टॅगलाईन देण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये चर्चा होणार आहे. त्यासाठी विरोधकांची एक बैठक होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरोधकांच्या आघाडीला ‘जितेगा भारत’ अशी टॅगलाईन?

मिळालेल्या माहितीनुसार विरोधकांच्या INDIA या आघाडीला ‘जितेगा भारत’ अशी टॅगलाईन दिली जाण्याची शक्यता आहे. जवळजवळ हे नाव निश्चित झाले आहे. मात्र अद्याप या टॅगलाईनवर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. काँग्रेसचे काही नेते या आघाडीच्या INDIA या नावाला ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ अशी टॅगलाईन द्यावी, अशी मागणी करत आहेत.

बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा

विरोधकांच्या आजच्या बैठकीत अन्य मुद्द्यांवरही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. मणिपूरमधील हिंसाचार, तेथील सध्याची परिस्थिती यावर चर्चा केली जाऊ शकते. तसेच डीएमके पक्षाने राज्यसभेत पत्र पाठवत सर्व कामकाज थांबवून तमिळनाडूमधील राज्यपालांकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर चर्चा करावी, अशी मागणी करण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरही विरोधकांच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

विरोधकांच्या आघाडीला हिंदी भाषेत टॅगलाईन

विरोधकांच्या INDIA या आघाडीला देण्यात येणाऱ्या टॅग लाईनवर वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी मते आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या टॅगलाईनमध्ये भारत हे नाव कायम राहणार आहे. बंगळुरू येथील बैठकीत काही पक्षांनी आघाडीच्या नावाला हिंदी भाषेत टॅगलाईन असावी, अशी भूमिका घेतली होती.

हिमंता बिस्वा सर्मा यांची विरोधकांवर टीका

दरम्यान, विरोधकांनी आपल्या आघाडीला INDIA असे नाव दिल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी एक ट्वीट करत विरोधकांवर टीका केली. “आपल्या समाजात भारत आणि इंडिया यावरून कायम संघर्ष होत राहिलेला आहे. इंग्रजांनी आपल्या देशाला इंडिया असे नाव दिले. आपण स्वत:ला वसाहतवादी वारशातून मुक्त करायला हवे. आपले पूर्वज हे भारतासाठी लढलेले आहेत. आम्हीदेखील भारतासाठीच काम करत राहू. भाजपा हा पक्ष भारतासाठी आहे,” असे,” असे हिमंता बिस्वा सर्मा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.

“…मग ते भारतीय नाहीत का?”

सर्मा यांच्या या ट्वीटनंतर काँग्रेसने त्यांच्यावर सडकून टीका केली. “यातून भाजपाचा विभाजनवादी विचार दिसतो. त्यांनी भारताला वेगवेगळ्या पद्धतीने विभाजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारत हा इंडिया आहे आणि इंडिया हा भारत आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. तुम्ही धर्म, जात, समाज, वंश यावरून लोकांचे विभाजन करता. क्रिकेटच्या मैदानात जे लोक इंडियन खेळाडूंना प्रोत्साहन देतात ते भारतीय नाहीत का? जे लोक जगाला आम्ही इंडियन आहोत, असे सांगतात ते भारतीय नाहीत का? बंधुभाव, देशभक्ती यामुळे आपण इंडियन होतो. जुडेगा भारत, जितेगा इंडिया,” असे म्हणत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सर्मा यांच्यावर टीका केली.

जयराम रमेश यांची सर्मा यांच्यावर टीका

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीदेखील हिमंता बिस्वा सर्मा यांच्यावर टीका केली. “सर्मा यांचे नवे मार्गदर्शक नरेंद्र मोदी यांनी देशाील वेगवेगळ्या योजनांना स्कील इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, डिजिटल इंडिया अशी नावे दिलेली आहेत. त्यांनी वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘टीम इंडिया’ म्हणून एकत्र काम करावे, असे आवाहन केलेले आहे. त्यांनी याआधी इंडियाला मतदान करा, असे मतदारांना आवाहन केलेले आहे. मात्र जेव्हा २६ पक्षांनी एकत्र येत आपल्या आघाडीला INDIA असे नाव दिल्यानंतर सर्मा समोर येऊन इंडिया या नावात वसाहतवादी मानसिकता आहे, असे सांगत आहेत. हीच बाब अगोदर सर्मा यांनी मोदी यांना सांगावी,” अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition parties meeting today for finalizing tagline for india alliance name may give hindi name prd
Show comments