२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी देशपातळीवर विरोधक एकत्र येत आहेत. या प्रयत्नांना आजच्या बैठकीत (१८ जुलै) एक निर्णायक वळण मिळाले आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांना पराभूत करण्यासाठी एकत्र येण्यावर एकमत झाले. विशेष म्हणजे विरोधकांच्या या आघाडीला ‘INDIA’ म्हणजेच ‘इंडयन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझीव अलायन्स’ असे नाव देण्यात आले आहे.
ही बैठक संपल्यानंतर विरोधी पक्षाच्या प्रमुखांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बैठकीत झालेल्या चर्चेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या बैठकीनंतर विरोधी पक्षांतील काही महत्त्वाच्या नेत्यांनी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या उपमुख्यमंत्री ममता बॅनर्जी आदी नेत्यांनी भाजपा, एनडीएवर सडकून टीका केली.
आणखी वाचा-बिहारमध्ये भाजपासमोर मोठे आव्हान, NDA तील घटकपक्षांमध्ये समतोल कसा धारणार?
कोण काय म्हणाले?
NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) आता INDIA ला पराभूत करू शकेल का? भाजपा तुम्ही INDIA ला आव्हान देऊ शकाल का. आम्ही आमच्या मातृभूमीवर प्रेम करतो. आम्ही देशातील दलित, गरीब, शेतकऱ्यांसाठी एकत्र आलो आहोत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
“नरेंद्र मोदी विरोधी पक्षांना घाबरले”
मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएवर सडकून टीका केली. “सध्या भाजपा ३० पक्षांना सोबत घेऊन एनडीएची बैठक घेत आहे. मी भारतात आतपर्यंत एवढे पक्ष कधी ऐकलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांना घाबरले आहेत. आम्ही येथे लोकशाही, भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत,” असे खरगे म्हणाले.
आणखी वाचा- “काँग्रेसला पंतप्रधानपदात स्वारस्य नाही”, मल्लिकार्जुन खरगे यांचे मोठे विधान!
हा देशच आमचे कुटुंब- उद्धव ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील भाजपावर सडकून टीका केली. “ही आमची दुसरी यशस्वी बैठक आहे. हुकूमशाहीविरोध आम्ही एकत्र झाले आहोत, हे तुम्ही पाहातच आहात. आम्ही आमच्या कुटुंबासाठी अशा प्रकारे एकत्र आलो आहोत, असा दावा काहीजण करत आहेत. बरोबर आहे. हा देश आमचे कुटुंब आहे. आम्ही देशरुपी कुटुंबासाठी लढत आहोत,” असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.
“लढा भारत विरुद्ध नरेंद्र मोदी”
राहुल गांधी यांनी २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत भाजपावर टीका केली. “हा लढा भाजपा आणि भाजपाच्या विचारधारेविरोधात आहे. हा लढा भारतासाठी आहे. याच कारणामुळे आमच्या आघाडाली INDIA असे नाव देण्यात आले आहे. हा लढा भारत आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
आणखी वाचा-भाजपाचे बळ वाढणार! चिराग पासवान यांचा NDA मध्ये सामील होण्याचा निर्णय
“देशासाठी नवे स्वप्न घेऊन येत आहोत”
आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील विरोधकांच्या आघाडीवर भाष्य केले. बंगळुरूमध्ये एकूण २६ पक्ष एकत्र आले आहेत. भारताला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या जो द्वेष पसरवला जात आहे, त्यापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही देशासाठी नवे स्वप्न घेऊन येत आहोत,” असे अरविंद केजरीवाल म्हणाले.