आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता मागील अनेक महिन्यांपासून देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री तथा जेडीयू पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी देशातील सर्व महत्त्वाच्या विरोधी पक्षांची येत्या १२ जून रोजी बैठक होणार होती. मात्र आता ही बैठक येत्या २३ जून रोजी होणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. देशातील विरोधी पक्षांचे सर्वोच्च नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले आहे.
याआधी विरोधकांची बैठक १२ जून रोजी पार पडणार होती. मात्र या बैठकीत राहुल गांधी तसेच खरगे उपस्थित राहू शकणार नाहीत, असे काँग्रेसने कळवले होते. याच कारणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक २३ जून रोजी होणार आहे. या बैठकीसाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री तथा डीएमके पक्षाचे नेते एमके स्टॅलिन असे देशातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी २०२४ च्या लोकसभा निडणुकीवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली विरोधकांची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पटणा येथे ही बैठक पार पडेल.
राहुल गांधींसह इतर प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार
विरोधकांची बैठक तसेच या बैठकीसाठी नेत्यांच्या उपस्थितीबाबत जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह यांनी अधिक माहिती दिली आहे. “काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी १२ जून रोजीच्या बैठकीला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे ही बैठक आम्ही पुढे ढकलली आहे. आता आम्हाला सर्वच प्रमुख पक्षांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे,” असे राजीव रंजन सिंह म्हणाले आहेत. सिंह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या बैठकीला राहुल गांधी, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे, एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, आप पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआय पक्षाचे नेते डी राजा, सीपीएम पक्षाचे नेते सिताराम येच्यूरी, सीपीआय-एमएल पक्षाचे नेते दीपांकर भट्टाचार्य आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
आम्हाला भाजपामुक्त भारत हवाय
राजीव रंजन सिंह यांनी या बैठकीबाबत बोलताना भाजपावर सडकून टीका केली. “विरोधकांच्या या बैठकीला खूप महत्त्व आहे. कारण सध्या देशात अघोषित आणीबाणी आहे. जे मोदी सरकारवर टीका करतील त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. देशात पुन्हा एकदा लोकशाहीची स्थापना करण्यासाठी आम्हाला भाजपामुक्त भारत हवा आहे,” असे सिंह म्हणाले.
समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न- तेजस्वी यादव
या बैठकीबाबत बिहारचे उपमुख्यमंत्री तथा आरजेडी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “विरोधकांना एकत्र करण्यासाठी नितीश कुमार आणि आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्याकडून एकत्रितपणे प्रयत्न केला जात आहे. हे दोन्ही नेते समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातील लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे. २३ जून रोजी आयोजित केलेली बैठक ही फार महत्त्वाची असून या बैठकीतून काहीतरी सकारात्मक परिणाम समोर येतील,” असे तेजस्वी यादव म्हणाले.
जागावाटपावरून काँग्रेसशी मतभेद आहेत का?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून काँग्रेसशी मतभेद आहेत का? असा प्रश्न राजीव रंजन सिंह यांना विचारण्यात आला. यावर बोलताना “सध्यातरी आमची जागावाटपावर कोणतीही चर्चा झालेली नाही. सध्यातरी आम्ही एकत्र येण्यावर विचार करत आहोत,” असे सिंह यांनी स्पष्ट केले.
‘ही बैठक आगामी राजकारणाची दिशा ठरवणार’
या बैठकीबाबत जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने अधिक माहिती दिली आहे. “२३ जून रोजी विरोधकांची पहिलीच बैठक होत आहे. त्यामुळे आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. विरोधकांची ऐकी दिसावी यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. ही बैठक आगामी राजकारणाची दिशा ठरवणार आहे,” असे या नेत्याने सांगितले.
हे ही वाचा >> Karnataka : भाजपा २०२४ मध्ये विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार? सदानंद गौडांनी स्वपक्षावरच केले आरोप
पक्षांच्या अध्यक्षांनीच बैठकीला उपस्थित राहावे- नितीश कुमार
दरम्यान, राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे काँग्रेसने राहुल गांधी १२ जूनच्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत, असे जेडीयूला सांगितले होते. त्यानंतर या बैठकीला पक्षाच्या प्रमुखांनीच उपस्थित राहावे. कोणताही प्रतिनिधी पाठवू नये, असे नितीश कुमार म्हणाले होते. त्यानंतर आता २३ जून रोजीच्या बैठकीला देशातील सर्व विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.