येत्या २३ जून रोजी बिहारमधील पटणा येथे विरोधकांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला जवळजवळ २० विरोधी पक्षांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच विरोधकांच्या संभाव्य आघाडीची शक्यतादेखील या बैठकीत पडताळून पाहिली जाणार आहे. दरम्यान बैठकीसाठी संयुक्त जनता दलाचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूर्ण तयारी केली आहे. पटणा शहरात जिथे-तिथे विरोधी पक्षातील नेत्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
‘मन की नही, काम की बात’
बिहारची राजधानी पटणा येथे ही बैठक पार पडणार आहे. बीर चंद पटेल मार्गावर संयुक्त जनता दालाचे मुख्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरात नितीश कुमार यांचे मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमावर टीकात्मक भाष्य करत आता ‘मन की नही, काम की बात’ असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. याच बॅनरच्या बाजूला आणखी एक पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर ‘आगाझ हुआ, बदल होगा’ असे लिहिलेले आहे. २३ जून रोजी होणाऱ्या बैठकीच्या रुपात विरोधकांच्या ऐक्याला सुरुवात झाली आहे. लवकरच हे ऐक्य सत्यात उतरणार आहे, असे या पोस्टरच्या माध्यमातून सूचवण्यात आले आहे. पटणा येथे होणाऱ्या बैठकीला विरोधी पक्षाचे २० प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी किमान समान कार्यक्रमवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
बैठकीला वेगवेगळ्या पक्षाचे नेते उपस्थित राहणार
पटणा येथील १ अॅनी मार्गावर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे. याच ठिकाणी बैठकीला आलेल्या नेत्यांच्या जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. २२ -२३ जून या कालावधीत येथे खास बिहारी शैलीतील जेवण तयार करण्यात येणार आहे. बीर चंद पटेल मार्गावरच राज्य शासनाचे अतिथीगृह आहे. या अतिथिगृहात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री तथा डीएमके पक्षाचे प्रमुखे एम के स्टॅलिन, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आदी नेते याच अतिथीगृहात राहणार आहेत. त्यामुळे या भागातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे.
बहुतांश नेते बैठक संपल्यानंतर लगेच परतणार
या बैठकीसाठी ममता बॅनर्जी, एम के स्टॅलिन हे नेते २२ जून रोजीच पटणा येथे दाखल होणार आहेत. तर बहुतांश नेते बैठकीच्या दिवशीच म्हणजे २३ जून रोजी पटणा येथे पोहोचणार आहेत. खरगे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे आदी नेते चार्टर्ड विमानाने पटणा येथे उतरणार आहेत. बहुतांश नेते बैठक संपल्यानंतर लगेच परततील.
संयुक्त जनता दलाच्या कार्यालयासमोर मोठे पोस्टर
पटणा शहराच्या मुख्य भागांत वेगवेगळे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर विरोधी पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो आहेत. संयुक्त जनता दलाच्या कार्यालयासमोर मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर फक्त नितीश कुमार यांचा फोटो आहे. तर बीर चंद पटेल रस्त्यावर असलेल्या आरजेडी पक्षाच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, अखिलेश यादव, नितीश कुमार अशा नेत्यांचा फोटो आहे. भाजपाच्या कार्यालयासमोर मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोठे बॅनर लावण्यात आले आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावले राहुल गांधीचे बॅनर
पटणा विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यानेदेखील सर्वत्र बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्या-त्या पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचे फोटो असेलेले हे बॅनर्स लावले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनर्सवर राहुल गांधी यांचा फोटो आहे. बेली रोडवर एक मोठे पोस्टर आहे, ज्यावर विरोधी पक्षातील जवळजवळ सर्वच नेत्यांचे फोटो आहेत. यामध्ये नितीश कुमार, तेजस्वी यादव, राहुल गांधी, स्टॅलिन यांचादेखील समावेश आहे.
आम आदमी पार्टीच्या समर्थकांनीही अरविंद केजरीवाल यांचे स्वागत करणारे बॅनर्स ठिकठिकाणी लावले आहेत. या बॅनर्सवर केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेदेखील दिसत आहेत.
या बैठकीसाठीच्या सुरक्षेबाबत पटणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे, असे सांगितले आहे.
किमान समान कार्यक्रम ठरवण्याचा आमचा प्रयत्न
संयुक्त जनता दलाचे मुख्य प्रवक्ते के सी त्यागी यांनी या बैठकीबाबत अधिक माहिती दिली आहे. “या बैठकीसाठी अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. पटणा येथील बैठक यशस्वी होण्याचे हे संकेत आहेत. या बैठकीच्या माध्यमातून किमान समान कार्यक्रम ठरवण्याचा आमचा प्रयत्न असेल. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी आम्ही पहिले पाऊल टाकले आहे,” असे के सी त्यागी यांनी सांगितले.
आरजेडी पक्षाचे प्रवक्ते सुबोध कुमार मेहता यांनीदेखील विरोधकांच्या आघाडीमुळे २०२४ च्या निवडणुकीला एक दिशा मिळणार आहे. संवैधानिक मुल्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही जनतेला पर्याय देत आहोत, असे म्हणत या बैठकीचे स्वागत केले आहे.