Pahalgam Terror Attack Opposition backs Centre : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षणविषयक केंद्रीय समितीच्या (सीसीएस) बैठकीनंतर १९६० च्या ‘सिंधू जल करारा’स स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी आणि कटाच्या सूत्रधारांविरोधात केंद्र सरकार जी कारवाई करेल त्या कारवाईला विरोधी पक्षांनी बिनशर्त पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचवेळी, पहलगाम येथे झालेला हल्ला ही सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेचं सर्वात मोठं अपयश असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.
गुरुवारी (२४ एप्रिल) दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला पहलगामचा बदला घेण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. तसेच हा हल्ला म्हणजे आपल्या संरक्षण यंत्रणेत, गुप्तचर यंत्रणेत कमतरता असल्याचं विरोधकांनी नमूद केलं. त्याचबरोबर सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित असल्यामुळे विरोधकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.
संरक्षण व गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींवरून विरोधकांचा सरकारला प्रश्न
सर्वपक्षीय बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाध सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्योरिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी या बैठकीवेळी संरक्षण व गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींवरून सरकारसमोर प्रश्न उपस्थित केले.
सर्वपक्षीय बैठकीला मोदी अनुपस्थितीत, विरोधकांचा आक्षेप
सर्वपक्षीय बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “अशा बैठकीला पंतप्रधानांनी उपस्थित राहणे महत्त्वाचे असते. कारण त्यांनी घेतलेले निर्णय अंतिम व महत्त्वाचे असतात. सरकारचे प्रतिनिधी आम्हाला म्हणाले की आम्ही या बैठकीनंतर पतंप्रधानांना बैठकीतील सर्व माहिती (ब्रीफिंग) देऊ. मात्र पंतप्रधानांनी स्वतः या बैठकीला उपस्थित राहणं, आमचे व पर्यायाने जनतेचे मुद्दे ऐकणं अधिक महत्त्वाचं असतं. ब्रीफिंगमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी नीट सांगितल्या जातील की नाही याबाबत साशंकता असते.”
बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही : खर्गे
खर्गे म्हणाले, “सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेच्या चुकीमुळे आपले शत्रू हा हल्ला करू शकले. जे लोक सुरक्षेची जबाबदारी पार पाडू शकले नाहीत त्यांच्यावर सरकारने कारवाई केलेली नाही. या बैठकीला उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याची चूक मान्य केली. ते म्हणाले, आम्ही पूर्ण सुरक्षा व्यवस्था प्रदान केली आहे. तरीदेखील हा हल्ला झाला.”
राहुल गांधी काय म्हणाले?
दुसऱ्या बाजूला, बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले, “आम्ही सुरक्षा व्यवस्थेतीत त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला. आपल्याकडे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असताना अशी चूक कशी काय होऊ शकते? हजारो पर्यटक तिथे होते आणि पोलिसांना त्याची जराही कल्पना नव्हती. त्यामुळेच तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती.”
आप नेत्याने सांगितलं, नेमकी चूक कोणाची?
आपचे नेते संजय सिंह यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की सरकारने “आम्हाला या हल्ल्याची माहिती देताना सांगितलं की ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तो भाग पर्यटकांसाठी अमरनाथ यांत्रेदरम्यान खुला केला जातो. त्यावेळी सुरक्षा व्यवस्था कडक केली जाते. मात्र, यावेळी तो भाग २० एप्रिलपासून खुला करण्यात आला होता. मात्र, याबद्दल सुरक्षा यंत्रणेला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नव्हती. २० एप्रिलपासून हे ठिकाण कुठल्याही सुरक्षेशिवाय खुलं होतं. सुरक्षा व्यवस्थेतील ही एक मोठी चूक होती. जी आमच्या निदर्शनास आली आहे.”
तर, संजय सिंह यांचा मुद्दा पुढे नेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पुण्यातील टूर ऑपरेटर्सना (पर्यटन कंपन्या) देखील हे ठिकाण पर्यटकांसाठी खुलं करण्यात आल्याची माहिती होती.”
दहशतवाद्यांविरोधातील कारवाईसाठी आम्ही सरकाररोबर : विरोधक
दरम्यान, खर्गे व विरोधी पक्षांचे इतर प्रतिनिधी म्हणाले, “देशाच्या हितासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला आम्ही पाठिंबा देऊ. या मुद्द्यावर आमचं एकमत आहे, आम्ही सरकारबरोबर आहोत. यामध्ये आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करू जेणेकरून देशाच्या शत्रूंना संदेश जाईल की आम्ही एकजूट आहोत.
राहुल गांधी काय म्हणाले?
तर, राहुल गांधी म्हणाले, “पहलगाम येथे घडलेल्या घटनेचा आम्ही सर्वांनी एकमुखाने निषेध केला आहे. या घटनेनंतर आता सरकार जी कारवाई करेल त्यामध्ये आम्ही सरकारबरोबर आहोत. काँग्रसचा सरकारला पूर्ण पाठिंबा आहे.