महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात असलेल्या बाबा सिद्दीकींची शनिवारी (१२ ऑक्टोबर) हत्या करण्यात आली. चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळख असलेल्या बाबा सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या ईफ्तार पार्ट्यांना बॉलीवूड सेलिब्रिटींचा राबता असायचा. यातून त्यांनी राजकारण आणि बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. बाबा सिद्दीकी यांचे पूर्ण नाव झियाउद्दीन सिद्दीकी होते. मुळचे बिहारचे व्यापारी असलेल्या अब्दुल रहीम यांचे ते सुपुत्र. अठरा वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच १९७७ साली त्यांनी काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर १९८० साली त्यांची वांद्रे तालुका युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. दोन वर्षांच्या आत त्यांना अध्यक्षपद मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसमध्ये आल्यानंतर बाबा सिद्दीकी एका पदानंतर दुसरे पद मिळत वर वर जाऊ लागले. १९८८ साली त्यांना मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले. तसेच १९९२ साली ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले.

याचकाळात बाबा सिद्दीकी यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील दत्त यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण केले. सुनील दत्त यांनी पाचवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. दत्त यांच्याशी संबंध असल्यामुळे १९९९ साली त्यांना वांद्रे पश्चिम विधानसभेचे तिकीट मिळाले. या ठिकाणीही पहिल्याच प्रयत्नात त्यांचा विजय झाला. २००४ ते २००८ या आघाडी सरकारच्या काळात बाबा सिद्दीकी यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार, अन्न व औषध प्रशासन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद भूषविले.

हे वाचा >> Baba Siddique Murder: “हे तर सत्कर्म…”, सिद्दीकींच्या हत्येनंतर बिश्नोई गँगची कथित पोस्ट व्हायरल, सलमान खानलाही दिला इशारा

काँग्रेस पक्षाचा अल्पसंख्याक समाजाचा महत्त्वाचा नेता असूनही २०१४ साली मोदी लाटेत त्यांना भाजपाच्या आशीष शेलार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून राजकारणात पुनरागमन करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. २०१९ साली त्यांनी स्वतः निवडणूक न लढविता आपल्या मुलाला वांद्रे पूर्व विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली. या निवडणुकीत पाच हजार मतांच्या मताधिक्याने त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीचा विजय झाला.

दरम्यान, २०१९ साली काँग्रेसने शिवसेनेशी आघाडी करून महाविकास आघाडीची स्थापना केल्यामुळे बाबा सिद्दीकी यांचे काँग्रेसशी मतभेद झाले होते, त्यामुळे स्वतःचे आणि मुलाचे राजकीय भवितव्य वाचविण्यासाठी त्यांनी बिहारमध्ये राजकीय बस्तान बसविण्याचा विचार केल्याचे सांगितले जाते. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याकडे राज्यसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यात त्यांना अपयश आले.

हे ही वाचा >> Salman Khan on Baba Siddique: पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सलमान खाननं घेतलं होतं बाबा सिद्दीकींचं नाव; म्हणाला, “माझं मतदान…”

अजित पवार गटात जाण्याचा मार्ग का निवडला?

२०२२ आणि त्यानंतर २०२३ साली अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बाबा सिद्दीकी यांना संधी दिसू लागली, त्यामुळे त्यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसमध्ये त्यांना ४८ वर्ष पूर्ण झाली होती. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपाशी आघाडी केल्याचे माहीत असूनही बाबा सिद्दीकी यांनी राजकीय सोयीची भूमिका घेऊन पक्षप्रवेश केल्याचे बोलले गेले. २०१७ मध्ये एसआरए प्रकल्पाशी संबंधित एका मनी लाँडरिंग प्रकरणात वांद्रे येथील त्यांच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आले होते.

हे ही बघा >> PHOTO : बाबा सिद्दीकी होते कोट्यधीश; मुंबई, राजस्थान ते UAE मधील तब्बल ‘इतकी’ मालमत्ता सोडली मागे!

इफ्तार पार्ट्यांचे आयोजन आणि बॉलीवूडशी मैत्री

राजकारणा व्यतिरिक्त सिद्दीकी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी ओळखले जात होते. त्यांच्या पार्ट्यांत अनेक सेलिब्रिटींची रेलचेल असायची. २०१३ साली त्यांनी शाहरुख खान आणि सलमान खान यांना एकत्र आणून दोघांमध्ये अनेक काळांपासून सुरू असलेले वितुष्ट संपुष्टात आणल्याचे बोलले जात होते. दोन्ही अभिनेत्यांचा गळाभेट घेतानाचा फोटो तेव्हा बराच गाजला होता. या भेटीच्या मध्यस्थानी होते बाबा सिद्दीकी.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ordinary worker to minister popular in bollywood too how was baba siddiqui rise and political journey