चंद्रपूर: जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला घराणेशाहीचे ग्रहण लागले आहे. नेत्याच्या कुटुंबातील सदस्य खासदार, आमदार, माजी नगराध्यक्ष किंवा पक्षसंघटनेत पदाधिकारी आहेतच. आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठीही ते सरसावले आहेत. यामुळे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे.

देशपातळीवर काँग्रेस पक्षात घराणेशाही असल्याचा आरोप भाजपकडून नेहमीच होत आला आहे. आता जिल्हास्तरावरही तीच स्थिती दिसून येत आहे. प्रस्थापित नेत्याच्या कुटुंबातील व्यक्तीला डावलून सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिल्याचे उदाहरण गेल्या कित्येक वर्षांत बघायला मिळाले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहे. या सहाही मतदारसंघांत नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच उमेदवारीसाठी आग्रही दिसत आहेत.

हेही वाचा >>>Exit Polls: एग्झिट पोल खरे ठरतात का? हरियाणा व जम्मू-काश्मीरमध्ये काय आहे अनुभव? वाचा २०१४-१९ ची स्थिती!

वरोरा विधानसभा मतदारसंघात पूर्वी दादासाहेब देवतळे कुटुंबाचे वर्चस्व होते. संजय देवतळे आमदार व मंत्री होते, तर डॉ. विजय देवतळे, डॉ. आसावरी देवतळे जिल्हा बँकेत संचालक व जिल्हा परिषदेत सभापती, सदस्य राहिले. यानंतर बाळू धानोरकर खासदार झाले. त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर या आमदार झाल्या आणि सध्या त्या विद्यमान खासदार आहेत. धानोरकर कुटुंबातील अनिल धानोरकर भद्रावतीचे नगराध्यक्ष होते. आता धानोरकर कुटुंबाशीच संबंधित अनिल धानोरकर यांच्यासह राजेंद्र चिकटे व प्रवीण काकडे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. यामुळे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते आम्ही कायम झेंडेच उचलावेत का, असा प्रश्न विचारू लागले आहेत.

राजुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचे वर्चस्व होते. त्यांचे बंधू अरुण धोटे राजुराचे माजी नगराध्यक्ष. दुसरे बंधू शेखर धोटे जिल्हा बँकेत संचालक. पुतण्या शंतनू धोटे युवक काँग्रेस अध्यक्ष. आता अरुण धोटे विधानसभा लढण्यास इच्छुक असून पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे बाजार समितीचे संचालक उमाकांत धांडे, आशीष देरकर यांनी विधानसभा लढण्याची इच्छा प्रदर्शित करून व उमेदवारी अर्ज सादर करूनही त्यांना डावलले जाईल, अशी स्थिती आहे.

हेही वाचा >>>दीड महिन्यानंतर गद्दार बेरोजगार; उद्धव ठाकरेंची शिंदे यांच्यावर टीका

चिमूर विधानसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षांपासून सातत्याने पराभूत होणाऱ्या डॉ. अविनाश वारजूकर, डॉ. सतीश वारजूकर या दोन भावंडांशिवाय तिसरे नाव काँग्रेसमधून आले नाही.

ब्रह्मपुरीत वडेट्टीवार यांचाच वरचष्मा

ब्रह्मपुरीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशिवाय दुसरे नाव नाही. त्यांची कन्या शिवानी या काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. लोकसभा निवडणुकीत वडेट्टीवार यांनी मुलीशिवाय अन्य नावाच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला नव्हता. आता विधानसभेत देखील हेच चित्र बघायला मिळत आहे.

बल्लारपूर व चंद्रपूर मतदारसंघांतूनही सातत्याने राजकीय कुटुंबाशी संबंधितच नावे समोर येत आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला यंदाही या दोन्ही मतदारसंघांतून संधी मिळणे कठीणच आहे. यामुळे आम्ही निवडणुका लढण्याचे व खासदार-आमदार होण्याची केवळ स्वप्नेच बघायची का, असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.