कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजप – शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव वाढू लागला असताना, काँग्रेसची संघटना बांधणी पश्चिम महाराष्ट्रात करण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. या विजयाची पहिली आवृत्ती कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झाली होती. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्या विरोधात भाजपने चंद्रकांत सत्यजित कदम यांना उतरवले होते. या चुरशीच्या निवडणुकीत पाटील यांनी पक्षाला यश मिळवून दिले.
हेही वाचा… कसबा २८ वर्षांनंतर काँग्रेसच्या ताब्यात कसा गेला?
पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसचे चंद्रकांत आसगावकर यांच्या विजयात देखील सतेज यांचा महत्त्वाचा वाटा होता. काँग्रेसच्या आमदारांची संख्या कोल्हापूर जिल्ह्यात सहावर गेली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने त्यांनी जिल्ह्यातील दहा हजाराहून कार्यकर्ते उपस्थित ठेवून लक्ष वेधून घेतले होते. याच वेळी सतेज पाटील यांना मोठी जबाबदारी दिली जाईल असे संकेत मिळत होते.
हेही वाचा… महापालिका निवडणुकीत चिंचवडमध्ये भाजपसमोर आव्हान
पक्षात, सत्तेत प्रभाव
काँग्रेस पक्षाचे संघटन आणि मंत्रिमंडळातील काम अशी दुहेरी जबाबदारी सतेज पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडली आहे. युवक काँग्रेस कार्यकर्ता, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य असा त्यांचा प्रवास आहे. मंत्रिमंडळात सहा खात्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. दोन वेळा पालकमंत्री झाले असल्याने जिल्ह्याच्या राजकारणाचा त्यांचा अभ्यास आहे. नेटके नियोजन करून निवडणूक असो की पक्षाचा उपक्रम तो यशस्वीपणे तडीला नेण्याची त्यांची हातोटी आहे.
हेही वाचा… कसब्याच्या निकालाने पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार
संघटना भक्कम
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती भक्कम असली तरी हे स्थान कायम ठेवणे किंबहुना उंचावण्याचे आव्हान सतेज पाटील यांच्यासमोर असणार आहेत. पुतणे ऋतुराज पाटील यांना पुन्हा निवडून आणणे आणि अन्य दोन आमदारांना विजयासाठी मदत करावी लागणार आहे. चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक,प्रकाश आवाडे, विनय कोरे या आमदारांच्या मदतीने भाजपने तसेच शिंदे गटाने जिल्ह्यात वातावरण निर्मिती चालवली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकात कडवा मुकाबला होणार असताना काँग्रेसचा हात उंचावण्याचे आव्हान सतेज पाटील यांना पेलावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसकडे जनमानसात प्रभावी स्थान निर्माण करेल अशा नेतृत्वाची कमतरता आहे. ही उणीव भरून काढून काँग्रेससाठी पुन्हा पूरक वातावरण निर्माण करावे लागणार आहे.