आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील सहा उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, बिजनौरमधून यशवीर सिंग, नगीनामधून मनोज कुमार, मेरठमधून भानू प्रताप सिंग, अलिगढमधून बिजेंद्र सिंग, हाथरसमधून जसवीर वाल्मिकी आणि लालगंजमधून दरोगा सरोज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय समाजवादी पक्षाने भदोही लोकसभेची जागा तृणमूल काँग्रेसला दिली आहे. तृणमूल काँग्रेसकडून या जागेवर काँग्रेसचे माजी आमदार ललीतेशपती त्रिपाठी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्त्वाचे म्हणजे समाजवादी पक्षाच्या सहा उमेदवारांच्या यादीत दोन जागा नुकताच समाजवादी पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे. पक्षातील नेत्यांना डावलून बाहेरच्या उमेदवारांना संधी दिल्याने समाजवादी पक्षांतर्गत असंतोष वाढणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा – जागावाटपावरील नाराजीनाट्यानंतर अखेर ‘इंडिया’ आघाडी एकत्र; पण पुढे काय?

शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार समाजवादी पक्षाने मेरठमधून भानू प्रताप सिंग यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीवरही अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याशिवाय नगीना येथून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश मनोज कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. तसेच भदोहीची जागा तृणमूल काँग्रेसला दिली आहे. तृणमूल काँग्रेसकडून या जागेवर काँग्रेसचे माजी आमदार ललीतेशपती त्रिपाठी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ललीतेशपती त्रिपाठी हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांचे नातू आहेत.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मेरठमधून भाजपाचे उमेदवार राजेंद्र अग्रवाल यांचा विजय झाला होता. त्यांनी बसपाच्या हाजी याकूब कुरेशी यांचा ४ हजार ७२९ मतांनी पराभव केला. महत्त्वाचे म्हणजे या जागेसाठी समाजवादी पक्षाचे आमदार अतुल प्रधान यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, समाजवादी पक्षाकडून भानू प्रताप सिंग यांना उमेदवारी देण्यात आली.

पक्षाच्या या निर्णयानंतर अतुल प्रधान यांनी नाराजीही व्यक्त केली. एक्स या समाजमाध्यमांवर पोस्ट करत ते म्हणाले, “मेरठच्या जनतेने माझ्यासाठी संघर्ष करण्याचा संकल्प केला होता. मात्र, मला संधी मिळाली नाही. त्यामुळे मी जनतेची माफी मागतो.” इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना प्रधान यांनी असाही दावा केला की, समाजवादी पक्षाने यादी जाहीर केली असली तरी भानू प्रताप सिंग यांची उमेदवारी रोखून धरली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते याबाबत चर्चा करत आहेत. मात्र, समाजवादी पक्षातील अंतर्गत सूत्रांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

समाजवादी पक्षाने नगीनामधून मनोज कुमार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे. नगीनाच्या जागेसाठी आमदार मनोज कुमार पारस यांनी त्यांच्या पत्नी नीलम पारस यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. २०१९ मध्ये ही जागा समाजवादी पक्ष आणि बसपाच्या युतीचे उमेदवार गिरीश चंद्र यांनी लढवली होती. या निवडणुकीत चंद्र यांनी भाजपाच्या यशवंत सिंह यांचा दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता.

हेही वाचा – CAA वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पाश्चात्य देशांना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दाखवला आरसा, म्हणाले…

याशिवाय बदोहीच्या जागेसाठी समाजवादी पक्षाचे नेते हकीम लाल बिंद यांनी त्यांच्या पत्नी आशा देवी यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. तसेच बसपामधून नुकतेच समाजवादी पक्षात दाखल झालेले महेंद्र बिंद देखील या जागेसाठी उमेदवारी मागण्याच्या तयारीत होते. मात्र, समाजवादी पक्षाने ही जागा तृणमूल काँग्रेसला दिली, त्यामुळेही पक्षांमधील नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भदोही येथील समाजवादी पक्षाच्या नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत आहे. बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे पक्षांतील कार्यकर्त्यांचे मनोबल खचत आहे. बिजनौर येथील नेत्यानेही अशाचप्रकारची भावना व्यक्त केली आहे. ज्यांनी पक्षासाठी काम केले, त्यांना तिकीट का देऊ नये? बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने पक्षसंघटना कमकुवत होते, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Outsiders get ticket in samajwadi party new list sees anger within its own leader spb
Show comments