मुंबई : विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालेल्या महायुतीचा मोठा शपथविधी सोहळा गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानात पार पडला. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानिमित्ताने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठी बेस्टचा ताफा तैनात करण्यात आला होता. परंतु, बेस्टच्या सुमारे ५८० हून अधिक बस आझाद मैदान परिसरात असल्याने मुंबई शहरासह दोन्ही उपनगरांतील बेस्ट बस थांब्यावर बसची संख्या रोडावली होती.
हेही वाचा >>अलोट गर्दी नि जल्लोष! ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ … देवाभाऊ’ घोषणांनी परिसर दुमदुमला
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २,८०७ बस असून या बसमधून सुमारे ३२ लाख प्रवाशांचा दररोज प्रवास होतो. तर, दुसरीकडे बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीसह भाडेतत्त्वावरील बस ताफा हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे बसची वारंवारता घटली आहे. यात गुरुवारी बेस्ट उपक्रमामधील एकूण २७ आगारांमधून ५८२ बस शपथविधीसाठी तैनात करण्यात आल्या होत्या. यामधील सर्वाधिक बस या मुलुंड आगारातून ३८ बस, घाटकोपर, गोराई, धारावी, आणि प्रतीक्षा नगर आगारातून प्रत्येकी ३४ बस, मजास ३३ बस, देवनार ३२ बस, आणिक, सांताक्रूझ आणि वडाळा आगारातून प्रत्येकी ३१ बस तर, उर्वरित आगारातून शपथविधी सोहळ्यानिमित्त बस आणल्या होत्या. याचा फटका प्रवाशांना बसला. मुंबई शहर, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरातील आगारातून बस आणल्याने, प्रत्येक बेस्ट बस मार्गावर बसचा तुटवडा जाणवला. प्रत्येक बस थांब्यावर प्रवासी १५ ते ३० मिनिटे बसची वाट पाहत थांबले होते. बेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात बसचा तुटवडा असताना, मोठ्या प्रमाणात बेस्ट उपक्रमाने आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधीसाठी बस दिल्या.