गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसने अत्यंत खराब कामगिरी केली आहे, पण हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपाकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. निवडणुकीआधी गुजरात आणि हिमाचल प्रदेश ही दोन्ही राज्ये भाजपाच्या ताब्यात होती. पण हिमाचल प्रदेशात सत्तांतर घडवण्यात काँग्रेस यशस्वी ठरली आहे.
गुजरातमधील काँग्रेसच्या पराजयानंतर काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी ‘पीटीआय’शी संवाद साधला. यावेळी चिदंबरम म्हणाले, “गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिकेत भाजपाची सत्ता होती. या तीनपैकी दोन ठिकाणी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने (आप) खेळ बिघडवला आहे. ‘आप’ने यापूर्वी गोवा आणि उत्तराखंडमध्येही असंच केलं होतं,” असं चिदंबरम म्हणाले.
हेही वाचा- “…हे अतिशय दुर्दैवी आहे”, शिंदे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
उत्तराखंड आणि गोव्याप्रमाणेच गुजरातमध्येही ‘आप’ने खेळ बिघडवला आहे. दिल्ली वगळता इतर ठिकाणी ‘आप’मुळे काँग्रेसला नुकसान होतं. पी चिदंबरम म्हणाले की, २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने जनमत गोळा करण्यासाठी काँग्रेस सर्वोत्तम स्थितीत आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी बिगर-भाजपा आघाडी तयार केली जाऊ शकते. गुजरातमध्ये झालेल्या पराभवातून काँग्रेसने काहीतरी शिकलं पाहिजे, असं चिदंबरम यांनी नमूद केलं.
चिदंबरम पुढे म्हणाले, “तीनपैकी दोन ठिकाणी भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला, हा भाजपासाठी मोठा धक्का आहे. गुजरातमधील विजय महत्त्वाचा आहेच, पण हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिकेमध्ये सत्ताधारी भाजपाला निर्णायक पराभव पत्करावा लागला, हे वास्तव लपवता येणार नाही.”