जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार आमदार किशोर पाटील आणि शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उमेदवार वैशाली सूर्यवंशी ही लढत विविध अर्थांनी चर्चेत आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांतील उमेदवार ही या लढतीची एक बाजू तर, दोन्ही उमेदवार बहीण-भाऊ असणे ही दुसरी बाजू आहे. बहिणीने दिलेल्या आव्हानामुळे आमदार पाटील यांची वाट खडतर मानली जात असताना दोन मातब्बर बंडखोरही रिंगणात असल्याने डोकेदुखी वाढली आहे.
शिंदे गटाकडून आमदार किशोर पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे, तर प्रतिस्पर्धी ठाकरे गटाने आमदार पाटील यांच्या भगिनी वैशाली सूयर्वंशी यांना मैदानात उतरवून चुरस निर्माण केली आहे. वैशाली या शिवसेनेचे पाचोऱ्याचे दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या असून, किशोर पाटील हे त्यांचे पुतणे आहेत. आर. ओ. पाटील हयात असेपर्यंतच्या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते किशोर पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. या निवडणुकीत आर. ओ. पाटील यांच्या कन्या मैदानात असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांची मन:स्थिती काहीशी दोलायमान झाली आहे. शिवसेनेत पडलेले दोन्ही गट बहीण आणि भावाच्या गटात विभागले गेले आहेत.
हेही वाचा – ठाणे, पालघरवर महायुतीची भिस्त
कधीकाळी एकत्र फिरणारे बहीण-भाऊ व पक्षाचे पदाधिकारी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राजकारणात फारशा सक्रिय नसलेल्या वैशाली यांनी शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर किशोर पाटील यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरे यांना निष्ठावंत म्हणून साथ देण्याचे जाहीर केले. भावाच्या निर्णयानंतर लगेचच वैशाली यांनी हा निर्णय घेतल्याने पाचोऱ्यात निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशा प्रचाराला कितीतरी आधीपासूनच सुरुवात झाली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिले आहे.
निर्णायक मुद्दे
– पाचोऱ्यात ठाकरे गट आणि शिंदे गटाने बहीण-भावाला मैदानात उतरविल्यानंतर शिवसेनेच्या पारंपरिक मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. त्याचाच फायदा उचलण्याच्या उद्देशाने भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी बंडखोरी केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वाघ आणि शिंदे यांनी किशोर पाटील यांच्या विरोधात उमेदवारी केली होती.
हेही वाचा – लक्षवेधी लढत : काँग्रेसमधील बंडाळीचा भाजपला फायदा?
– घरातूनच मिळालेले आव्हान, मित्रपक्षातून झालेली बंडखोरी हे शिंदे गटासाठी अडचणीचे मुद्दे आहेत. पाणी प्रश्नासह मतदारसंघातील रखडलेले सिंचन प्रकल्प हे विषय ठाकरे गटांसह बंडखोर शिंदे आणि दिलीप वाघ यांच्याकडून मांडले जात आहेत.
लोकसभेतील राजकीय चित्र
– महायुती : ९७,५२३
– महाविकास आघाडी : ८०,९५७