Pachora Vidhan Sabha Constituency : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे ) विद्यमान आमदार किशोर पाटील यांना त्यांच्या बहिणीने आव्हान दिले आहे. यामुळे भाऊ-बहिणीची ही लढत लक्षणीय ठरणार आहे. विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी या रिंगणात उतरल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे ही वाचा… भाजपचे माजी दोन खासदार नवाब मलिक, बाबा सिद्दिकी यांच्या मुलांना राष्ट्रवादीची उमेदवारी

हे ही वाचा… रावेरमध्ये चौधरी परिवाराची चौथी पिढी राजकारणात; धनंजय चौधरी काँग्रेसचे उमेदवार

पाचोरा मतदासंघासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदार किशोर पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी ठाकरे गटाने वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली आहे. वैशाली या पाचोऱ्याचे माजी आमदार दिवंगत आर. ओ. पाटील यांच्या कन्या असून किशोर पाटील हे त्यांचे चुलत बंधू आहेत. मागील दोन पंचवार्षिक आमदार किशोर पाटील यांना पाचोऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आव्हान मिळत होते. या निवडणुकीत खुद्द त्यांचीच बहीण त्यांना लढत देण्यासाठी सज्ज झाली आहे. आर. ओ. पाटील हयात असेपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक राहिले होते. त्यांनीच पुतणे किशोर पाटील यांना २०१४ मध्ये आमदारकीसाठी पहिल्यांदा पुढे केले होते. त्यामुळे किशोर पाटील यांना दोनवेळा पाचोऱ्यातून आमदार होण्याचा बहुमानही मिळाला. मात्र, काकांच्या पश्चात शिवसेनेत उभी पडल्यानंतर आमदार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. दुसरीकडे आर. ओ. पाटील यांचा वारसा चालविणाऱ्या वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिले. त्यांना भावाचा एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय अजिबात पटला नाही. तेव्हापासूनच बहीण-भावातील मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप वाढत गेले. उद्धव ठाकरे यांनी वैशाली सूर्यवंशी यांना भक्कम पाठबळ देण्याचा प्रयत्न केला असून, काही दिवसांपूर्वी त्यांनी पाचोऱ्यात सूर्यवंशी यांच्यासाठी सभा देखील घेतली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pachora jalgaon assembly constituency shivsena shinde kishor patil vs shivsena thackeray group vaishali suryawanshi print politics news asj
Show comments