Padma Awards 2025 Announcement : केंद्र सरकारने शनिवारी (२५ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. याद्वारे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा केली. राष्ट्रपतींनी एकूण १३९ जणांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये सात दिग्गजांना ‘पद्म विभूषण’, १९ दिग्गजांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे; तर ११३ जणांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकसभेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी, भाजपाचे जुने नेते दिवंगत सुशील कुमार मोदी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. भुलई भाई म्हणून ओळखले जाणारे नारायण जी यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे. तर तेलंगणातील दलित नेत्या मांडा कृष्णा मदिगा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक क्षेत्रातील कामासाठी ज्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यापैकी बहुतेकजण हे राजकारणी किंवा राजकारणाशी संबंधित व्यक्ती आहे. तर माजी सरन्यायाधीश जगदीशसिंह खेहर व ज्येष्ठ विधीज्ञ सी. एस. वैद्यनाथन यांनादेखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

मनोहर जोशी

मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे पहिले बिगर-काँग्रेसी नेते होते. गेल्या वर्षी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. जोशी हे मूळचे रायगडचे असले तरी त्यांचे शिक्षण व पुढील कारकीर्द मुंबईतलीच. मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करून मराठी माणसांच्या हक्कांसाठी, भूमिपुत्रांसाठी लढा सुरू केल्यानंतर मनोहर जोशी देखील त्यात सहभागी झाले. १९६८ साली त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक म्हणून निवडून आले. चार वर्षांनंतर १९७२ मध्ये ते विधान परिषदेवर गेले. १९८९ पर्यंत त्यांनी विधान परिषदेत काम केले. १९९० मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. दादर मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. १९९९ पर्यंत त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. १९९५ साली महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर काँग्रेसी सरकार आले. राज्यात शिवसेना-भाजपा युतीचा विजय झाला. त्यानंतर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले. १९९९ साली लोकसभेच्या निवडणुकीआधी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते लोकसभेवर गेले. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून ते निवडून आले व दिल्लीला गेले.

१९९९ मध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. त्या सरकारमध्ये मनोहर जोशी यांना अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रिपद देण्यात आले. त्यानंतर त्यांना लोकसभेचे अध्यक्षपद देण्यात आले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ते खूप लोकप्रिय झाले. विरोधकांचीदेखील त्यांना पसंती मिळाली होती. शिवसेनेबद्दलची उत्तर भारतातील लोकांची धारणा बदलण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. २००६ ते २०१२ पर्यंत ते राज्यसभेचे खासदार होते. राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी संसदीय राजकारणातून माघार घेतली.

सुशील कुमार मोदी

भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांचे गेल्या वर्षी १३ मे रोजी निधन झाले. त्यांनी बिहारमध्ये भाजपाची मूळे रोवण्याचे काम केले होते. ते बिहारचे उपमुख्यमंत्रीदेखील राहिले होते. त्यांनी अनेक वर्षे लालू प्रसाद यादव व त्यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी संघर्ष केला. ते कैलाशपती मिश्रा यांच्यानंतरचे बिहार भाजपामधील दुसरे सर्वात मोठे नेते मानले जायचे. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केली होती. १९९० मध्ये ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते. १९९६ मध्ये यशवंत सिन्हा यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी हे पद सुशील कुमार मोदी यांच्या हाती दिले.

बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव ज्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवले गेले, त्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या पाच याचिकाकर्त्यांपैकी एक सुशील कुमार मोदीदेखील होते. त्यापाठोपाठ त्यांनी राबडी देवी यांच्याविरोधात अनियमिततेचे १७ खटले दाखल केले. यापैकी अनेक खटल्यांमध्ये त्यांनी राजद सरकारचा भोंगळ कारभार उघड केला. ९० च्या दशकात बिहारमध्ये भाजपाला बलवान पक्ष म्हणून पुढे आणण्यात मोदींचा सिंहाचा वाटा आहे. एनडीएचे सहयोगी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपाचे चांगले संबंध निर्माण करण्याचे श्रेयदेखील मोदी यांनाच दिले जाते.

मांडा कृष्णा मदिगा

मांडा कृष्णा मदिगा हे मदिगा आरक्षण पोराटा समितीचे (एमआरपीएस) नेते आहेत. मागील अनेक दशकांपासून ते दलितांचे उपवर्गीकरण व त्यानुसार आरक्षणाची मागणी करत लढा देत आहेत. २०२३ मध्ये तेलंगणा विधानसभा निवडणुकीवेळी मदिगा यांनी राज्यात भाजपाचा प्रचार केला होता. एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर भाषण करताना मदिगा यांना अश्रू अनावर झाले होते, त्यावेळी मोदींनी त्यांचे सांत्वन केले; त्या क्षणाचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. राज्यातील दलितांसाठी ते अनेक वर्षांपासून काम करत आहेत, त्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

नारायण जी (भुलई भाई)

नारायण जी उर्फ भुलई भाई हे उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचं निधन झाले. ते राज्यातील भाजपाचे सर्वात वयस्कर आमदार होते. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, “राजकारण व समाजसेवेत अमूल्य योगदान देणाऱ्या नारायण जी यांचे निधन ही आमच्यासाठी कधीही भरून न निघणारी पोकळी आहे. ते भाजपाचे सर्वात वयस्कर व मेहनती कार्यकर्ते होते. त्यांनी १०० व्या वर्षापर्यंत पक्षासाठी काम केले. त्यांना आपण भुलई भाई म्हणून ओळखतो. सार्वजनिक क्षेत्रातील त्यांचे योगदान कायम आमच्या लक्षात राहील.”