Who is Bhulai Bhai : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (२५ जानेवारी) पद्म पुरस्कारांची घोषणा केली. देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १३९ दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये जनसंघाचे (सध्याचा भारतीय जनता पक्ष) सर्वात जुने कार्यकर्ते नारायण ऊर्फ भुलई भाई यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. गेल्यावर्षी ३० ऑक्टोबर २०२४ मध्ये भुलई भाई यांचं निधन झालं होतं. वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच वयाच्या ११० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.
भुलई भाई कोण होते?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले भुलई भाई हे भाजपाचे सर्वात जुने कार्यकर्ते होते. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणेने त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. १९७४ मध्ये भुलाई भाई पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या नौरंगिया मतदारसंघातून जनसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर दोनवेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. आणीबाणीच्या काळात भुलई भाई यांनी इंदिरा गांधी यांच्यावर तिखट शब्दात टीका केली होती. जनसंघ पुढे भाजपा झाल्यानंतरही ते पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते.
आणखी वाचा : Padma Awards 2025 : महाराष्ट्रातील १४ दिग्गजांना पद्म पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी
उत्तर प्रदेशात दलित कुटुंबात जन्म
उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील पगरछाप्रा या छोट्याशा गावात भुलई भाई यांचा जन्म झाला होता. दलित कुटुंबात जन्मलेले भुलई भाई शेवटपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते, असे त्यांचे नातू अनुप चौधरी यांनी सांगितलं. करोना महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुलई भाई यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती, त्यावेळी ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही भुलई भाई यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केली होती.
भुलई भाई यांचे नातू काय म्हणाले?
अनुप चौधरी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “कुशीनगरचे जिल्हा दंडाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांनी मला शनिवारी (२५ जानेवारी) दुपारी फोन केला होता. परंतु, त्यावेळी त्यांनी पुस्काराबद्दल मला काहीही सांगितलं नाही. नंतर उत्तर प्रदेश सरकारच्या प्रधान सचिवांनी मला फोन केला आणि माझे आजोबा भुलई भाई ऊर्फ श्री नारायण यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती दिली.”
३२ वर्षीय अनुप म्हणाले, “माझे आजोबा एक हुशार विद्यार्थी होते. त्यांनी गोरखपूरमधील St Andrew’s College मधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं. गोरखपूर विद्यापीठातून एम.एड.पर्यंत उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते शिक्षणाधिकारी झाले. परंतु, १९७० मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार पूर्णवेळ संघ प्रचारक होण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. १९७१ मध्ये त्यांनी जनसंघाच्या तिकीटावर नौरंगिया विधानसभा निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.”
जनसंघाचे सलग तीनवेळा आमदार
पुढे बोलताना अनुप म्हणाले, १९७४ च्या विधानसभा निवडणुकीतही माझ्या आजोबांनी विजय मिळवला होता. १९७७ च्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले आणि १९८० पर्यंत आमदार राहिले.” अनुप म्हणाले, “२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत रामकोला (अनुसूचित जाती-राखीव) मतदारसंघातून मला तिकीट मिळवून देण्यासाठी आजोबांनी खूप प्रयत्न केले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विनंती करण्यासाठी ते माझ्यासोबत दिल्लीला आले होते. त्यावेळी त्यांचे वय १०८ वर्ष होते आणि आम्ही यूपी सदन येथे थांबलो होतो. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री राजनाथ सिंह यांची आम्ही भेटही घेतली होती. मात्र, मला निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही.”
हेही वाचा : Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील चाकूहल्ल्यावर राजकीय नेते शंका का घेत आहेत?
भगवा गमछा हीच भुलई भाईंची ओळख
भाजपाचे वरिष्ठ नेते भुलई भाई यांच्याकडे आदराने पाहायचे. भगवा गमछा हीच भुलई भाईंची ओळख होती. २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर भुलई भाई हे शपथविधी समारंभात विशेष पाहुणे म्हणून आले होते. लखनौ येथील कामगार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंचावरून खाली उतरून त्यांचा गौरवही केला होता.
गेल्यावर्षी ३० ऑक्टोबर २०२४ रोजी भुलई भाई यांनी वयाच्या ११० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. “राजकारण आणि समाजसेवेत अमूल्य योगदान देणाऱ्या नारायणजींचे निधन हे एक कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. ते भाजपाच्या सर्वात जुन्या आणि कष्टाळू कार्यकर्त्यांपैकी एक होते, ज्यांना आम्ही भुलई भाई म्हणूनही हाक मारत होतो. लोककल्याणाशी संबंधित त्यांचे कार्य नेहमीच लक्षात ठेवले जाईल. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो”, असं पंतप्रधान म्हणाले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून भुलई भाई यांना श्रद्धांजली वाहिली होती. “भाजपाच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्यांपैकी एक असलेले नारायण जी ऊर्फ भुलई भाई यांचे निधन अत्यंत दु:खद आहे, देश आणि राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमीच आठवणीत राहील. जनसंघ आणि भाजपाच्या माध्यमातून तरुणांना सांस्कृतिक शिक्षण देणारा त्यांचा राष्ट्रीयत्वाचा उत्साह आजही मला आठवतो, ओम शांती” अशा भावना शाह यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केली होती.