Palghar Assembly Election 2024 : लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज होऊन शिवसेना (शिंदे) पक्षाला रामराम ठोकून भाजपात गेलेले पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित तसेच शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गटात जाण्याऐवजी भाजपात प्रवेश करणारे बोईसरचे माजी आमदार विलास तरे यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर दोघांना शिवसेना शिंदे पक्षाच्या वाट्याला आलेल्या अनुक्रमे पालघर व बोईसर या मतदारसंघांत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

माजी खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश देण्यासंदर्भात हालचाली सुरु होत्या. उमदेवारी नाकारल्यानंतर भाजपामध्ये तात्काळ प्रवेश करण्याच्या त्यांच्या कृतीबद्दल अनेकांनी आक्षेप नोंदविला होता. तर शिवसेनेत फूट पडल्यापासून सोबत असणाऱ्या आमदार श्रीनिवास वनगा यांना डावलू नये अशी मागणी पुढे आल्याने गावित यांचा प्रवेश सलग दोन दिवस लांबणीवर पडला होता. सर्व असंतुष्ट घटकांची मुख्यमंत्री यांनी समजूत काढल्यानंतर पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या संजना जाधव तसेच बोईसरचे माजी आमदार विलास तरे यांनी रविवारी ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

हेही वाचा – पुणे जिल्ह्यात पवार कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला, २१ पैकी ७ मतदारसंघात परस्परांच्या विरोधात उमेदवार

शिवसेनेत झालेल्या बंडामध्ये आमदार श्रीनिवास वनगा यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देऊन पक्षांतर केले होते. त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री यांना सहानुभूती असली तरीही आमदारकीच्या कार्यकाळातील अक्रियाशीलता, मर्यादित लोकसंपर्क तसेच पक्ष वाढीसाठी विशेष योगदान प्राप्त न झाल्याने पालघरची उमेदवारी बदलावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षीय व्यासपीठांवर केली होती. त्यांच्याऐवजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैदेही वाढाण तसेच माजी खासदार राजेंद्र गावित यांची नावे चर्चेला होती. मात्र राजेंद्र गावित यांचा लोकसंपर्क व त्यांच्या उमेदवारीला शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच भाजपाचे जिल्हाप्रमुख यांनी दर्शविलेल्या पाठिंब्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित केल्याचे मानले जात होती. याबाबत वरिष्ठाकडून आश्वासन मिळाल्यानंतर राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला.

बोईसर येथे सध्या बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील विधिमंडळात प्रतिनिधित्व करत असून २०१९ निवडणुकीत शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणारे विलास तरे यांचा २७५२ मतांनी पराभव झाला होता. दरम्यानच्या काळात लोकसभा उमेदवारीवर लक्ष ठेवून विलास तरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजेंद्र गावित यांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपाच्या डॉ. हेमंत सवरा ज्यांना उमेदवारी देताना विलास तरे यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

बोईसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी इच्छुक होते. त्याचबरोबर गेल्या महिन्यात बहुजन विकास आघाडी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी बोईसरच्या उमेदवारीवर लक्ष ठेवून बविआ मधून शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश घेतला होता. मात्र या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरून असणारा अंतर्गत वाद, पक्ष संघटनेची ताकद व उमेदवारांचा लोकसंपर्क लक्षात घेऊन सध्या भाजपात असणाऱ्या विलास तरे यांचे पक्षांतर करून त्यांना शिवसेना (शिंदे) तर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाच्या प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीमध्ये पालघर व बोईसर जागेवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

पक्षांतराचे चक्र

सन २००४, २००९ व २०१४ व २०१६ या विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या उमेदवारीवर लढणाऱ्या राजेंद्र गावित यांनी २००९ मध्ये विजय संपादन केला होता तर २०१४ मध्ये ५१५ मताने पराभव झाला होता. ऍड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर २०१८ मध्ये झालेल्या पोट नवडणुकीत राजेंद्र गावित यांनी भाजपामध्ये पक्षांतर करून निवडणूक लढवत खासदारकी पटकावली होती. सन २०१९ मध्ये पालघर लोकसभेची जागा महायुतीने शिवसेनेच्या वाट्याला दिल्याने राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत पक्षांतर करून निवडणूक जिंकली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात राहण्याचे पसंद केले होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान शिवसेनेकडून उमेदवारी नाकारल्या गेल्यानंतर काही तासातच त्यांनी भाजपा प्रवेश केला होता. पालघर विधानसभेची जागा पुन्हा शिवसेनेला सुटल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या स्थानीय व वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून उमेदवारी निश्चितीसाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा – ‘मविआ’त छोट्या पक्षांची बंडखोरी

शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या विलास तरे यांनी सन २००९ मध्ये बहुजन विकास आघाडीत प्रवेश करून आमदारकी मिळवली होती. सन २०१४ मध्ये त्यांनी बहुजन विकास आघाडीमधूनच आमदारकी राखली होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत पक्षांतर करून निवडणूक लढवताना त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर खासदारकीकडे लक्ष ठेवून त्यांनी भाजपा प्रवेश केला होता. लोकसभा उमेदवारी नाकारली गेल्यानंतर देखील ते भाजपाशी एकनिष्ठ राहिले व त्यांनी बोईसर मतदारसंघात पक्ष संघटना वाढीसाठी भरीव काम केले. महायुतीमधील बोईसरची जागा शिवसेनेकडे वर्ग झाल्याने त्यांची योग्यता पडताळून शिवसेना (शिंदे) पक्षाने त्यांची उमेदवारी निश्चित केल्याचे सांगितले जात आहे.

साडूंमध्ये होणार लढत..

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने पालघरची उमेदवारी जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा यांना जाहीर केली असून राजेंद्र गावित हे त्यांचे सख्खे साडू आहेत. राजेंद्र गावित यांना उमेदवारी निश्चित झाल्याने दोन साडूंमध्ये लढत होणार आहे.

निष्ठावंत यांना प्रतीक्षा

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील अनेक शिवसेना नेत्यांनी शिंदे गटात जाण्याचे पसंत केले होते. मुख्यमंत्र्यांचे महत्त्वकांक्षी प्रकल्प राबविणे तसेच पक्षाच्या वाढीसाठी या मंडळींनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वाट्याला सुटलेले पालघर व बोईसर मतदारसंघात भाजपामधून आयात उमेदवार दिले गेल्याने पक्षातील निष्ठावंतांना पुढील पाच वर्षाचा कार्यकाळ प्रतिक्षेत घालवावा लागेल असे दिसून येत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळींनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश घेतला होता. मात्र राखीव जागेसाठी उमदेवार घडविणे किंवा गटागटाच्या अंतर्गत राजकारणामुळे सक्षम उमेदवार तयार करण्यास शिंदे सेनेचे पदाधिकारी अपयशी ठरल्याने आयात उमेदवारांवर भिस्त ठेवणे भाग पडल्याचे दिसून आले.