एजाज हुसेन मुजावर
सोलापूर : वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २०३० कोटी ७० लाख रूपये खर्चा विकास आराखडा तयार केला असताना हा कॉरिडॉर रद्द व्हावा या मागणीसाठी पंढरपुरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. हा कॉरिडॉर रद्द न झाल्यास स्थानिक भाजपच्या पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. तर काहीजण कॉरिडॉरच्या मुद्यावर पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची आणि पुढच्या वर्षी आषाढी यात्रेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी आमंत्रित करण्याची भाषा बोलत आहेत.
वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. परंतु हा आराखडा राबविताना विठ्ठल मंदिर परिसरासह अन्य भागातील मिळकती बाधित होणार असल्यामुळे संबंधित मिळकतदारांसह व्यापाऱ्यांनी या आराखड्याला तीव्र विरोध केला आहे. त्यासाठी गठीत झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसर बचाव समितीने गेल्या १७ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात मोर्चा काढला होता. त्यानंतर याच प्रश्नावर शुक्रवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा… पवारांची डी.लिट. : नांदेडला देणगी तर औरंगाबादेत वादाची ठिणगी!
हेही वाचा… गेहलोत-पायलट ही खरगेंची डोकेदुखी, वादावर तोडगा हे पहिले मोठे आव्हान
या आंदोलनात सहभागी झालेले पंढरपूर शहर भाजपचे अध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी पंढरपूर कॉरिडॉर रद्द न झाल्यास पंढरपूर शहर व तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील असा इशारा दिला. पक्षाचे नेते, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर कॉरिडॉरला यापूर्वीच विरोध करून त्याबाबतची निवेदने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दिली आहेत. तरीही विकास आराखडा लादला जाणार असेल तर त्याची किंमत सत्ताधारी म्हणून भाजपला चुकवावी लागेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिरसाट यांनी दिला. पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसर बचाव समितीचे अध्यक्ष नाना कवठेकर यांनी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूरसह अक्कलकोट आणि जत कर्नाटकला जोडण्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरवरही अन्यायाने हा प्रकल्प लादला जाणार असेल तर आम्हाला पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची मागणी करावी लागेल. त्यासाठी पुढील वर्षी आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या महापूजेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करावे लागेल, असा इशारा दिला आहे. तथापि, या आंदोलनात पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची मागणी झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी तीव्र संताप व्यक्त करीत कर्नाटकचा पुळका आलेल्या मंडळींना फटकारले आहे. पंढरपूर कॉरिडॉर रद्द करण्यास शासनाला भाग पाडण्याची पंढरपूरकरांमध्ये हिंमत आहे. त्याप्रमाणे आम्ही ही लढाई जिंकू, असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला आहे.