नफरत के बाजारमें मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ. भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधींनी हे वाक्य अनेकदा म्हटलं आहे. त्यांचं हे वाक्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. अशात पानिपतमधल्या एका हँडलुम दुकानदाराने आपल्या दुकानाच्या बाहेर राहुल गांधींसोबतचा फोटो लावत मोहब्बत की दुकान हा फलक लावला आहे. सोशल मीडियावर या तरूणाच्या मोहब्बत की दुकानची चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय म्हटलं आहे दुकानदार मोनूने?
मोहब्बत की दुकान असा फलक दुकानाबाहेर लावणारा मोनू म्हणतो की मी पानिपतमधल्या गोहाना रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून हँडलूम आणि टेक्सटाइलच्या वस्तूंचं दुकान चालवतो. तसंच मी इंडियन नॅशनल लोकदल या पक्षाला आदर्श मानतो. मात्र भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी जे वाक्य म्हटलं त्यामुळे मी भारावून गेलो. नफरत की बाजारमें मोहब्बत की दुकान खोल रहा हूँ असं राहुल गांधी म्हणाले. ते वाक्य माझ्या मनाला भिडलं म्हणून हा फलक मी माझ्या दुकानाबाहेर लावला असं मोनू सांगतो.
मोनू दुकानाबाहेरच्या फलकामुळे चर्चेत
मोनू त्याच्या दुकानाबाहेर लावलेल्या या अनोख्या फलकामुळे चर्चेत आला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पानिपतमध्ये होती तेव्हाही राहुल गांधी यांनी मोहब्बत की दुकान हे वाक्य म्हटलं होतं. यानंतर मी हा फलक या ठिकाणी लावला. आता येणारा-जाणारा प्रत्येकजण या फलकाकडे पाहतो. त्यानंतर माझ्याकडे पाहून स्मितहास्य करतो. मला खरंच खूप बरं वाटतं, एक आत्मिक समाधान मिळतं असंही मोनूने सांगितलं . लोकांच्या चेहऱ्यावर जे हसू हा फलक पाहून येतं तेच खऱ्या अर्थाने मोहब्बत की दुकान आहे असंही मोनू सांगतो.
लोक रोजच्या धकाधकीत त्यांच्या आयुष्याच्या विवंचनेत अडकलेले असतात. अशावेळी माझ्या दुकानावरून जात असताना त्यांना हा फलक दिसला की त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. एवढंच नाही तर त्यांना या फलकाकडे पाहून समाधान वाटतं. मला हा फलक लावल्याचं समाधान मिळतं ही बाब आहेच पण मला लोकांना मिळणारं समाधान जास्त महत्त्वाचं वाटतं असंही मोनूने सांगितलं. सध्या आपल्या देशात तिरस्कार पसरवला जातो आहे. लोक रंग, वर्ण, जात, धर्म यावरून आक्रमक होताना दिसत आहेत. अशात राहुल गांधी यांनी जे वाक्य म्हटलं ते माझ्या मनाला स्पर्श करून गेलं त्यामुळेच मी हा फलक लावला आहे असंही मोनू सांगतो.