दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे पडसाद देशभरात उमटले आहेत. अटकेविरोधात निदर्शने करण्यासाठी आप नेत्यांसह काँग्रेस नेतेदेखील रस्त्यावर उतरले आहेत. शुक्रवारी राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नईमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठी जरी केजरीवाल यांच्या अटकेला विरोध करीत असले तरी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अटकेचे समर्थन केले आहे. विशेषतः पंजाबमधील काँग्रेस नेते अटकेचे समर्थन करताना दिसत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारचा प्रमुख विरोधक आहे.
काँग्रेस नेत्यांची विरोधी प्रतिक्रिया
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग म्हणाले, “आम्ही सूडाच्या राजकारणाच्या पूर्णपणे विरोधात आहोत; मग ते पंजाबमध्ये असो किंवा राष्ट्रीय पातळीवर. विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी सीबीआय, ईडी व दक्षता विभाग यांसारख्या तपास यंत्रणांचा वापर होत राहिल्यास आपली लोकशाही प्रक्रिया कमकुवत होईल.”
२०१५ च्या एका प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केलेले काँग्रेस आमदार सुखपाल खैरा म्हणाले की, केजरीवाल या अटकेला पात्र आहेत. “मला आशा आहे की, मद्य घोटाळ्याचे ‘किंगपिन’ अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून योग्य उत्तर मिळाले असेल. त्यांनी माझ्यावर फसवणुकीचे आरोप केले होते. मी तुरुंगात असताना सार्वजनिक व्यासपीठावर त्यांनी मला तस्कर म्हटले होते,” असे ते म्हणाले. खैरा पुढे म्हणाले, “या बनावट क्रांतिकारकांनी पंजाबमध्ये त्यांच्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले आणि यात भाजपालाही मागे टाकले. ‘जे पेराल तेच उगवेल’ ही म्हण अरविंद केजरीवाल यांना लागू होते. ते आमच्यासारख्या राजकारण्यांना लक्ष्य करून, अटक करीत आले आहेत. ‘कट्टर इमानदार’ म्हणून ओळखल्या जाणार्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मला आशा आहे की, लोक त्यांचा खरा चेहरा ओळखू शकतील.”
काँग्रेसचे माजी मंत्री भारत भूषण आशू यांनीही असेच काहीसे विधान केले. माजी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री भारत भूषण यांना २२ ऑगस्ट २०२२ ला अन्नधान्याच्या वाहतुकीशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी २५ मार्चला या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला होता.
काँग्रेसचे लुधियानातील खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी सांगितले, “पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देशभरात मोठ्या जाहिराती देत आहेत की, आतापर्यंत ३०० लोकांना भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांत अटक करण्यात आली आहे. आता ते ही संख्या बदलून ३०१ करूच शकतात. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि अर्थमंत्री हरपाल सिंह चिमा यांचा समावेश असलेल्या पंजाबमध्ये असेच उत्पादन शुल्क धोरण लागू करण्यात आले आहे. असे दिसते की, ही संख्या लवकरच ३०२ होईल.”
“केजरीवाल आणि आप ‘जन स्वराज (लोकांचे राज्य)’ आणि लोकपाल नियुक्तीचे आश्वासन देऊन सत्तेवर आले होते; परंतु तेच सर्वांत मोठे भ्रष्टाचारी ठरले आहेत. आपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पंजाबमधून पैसा लुटला; जो अजून परत मिळालेला नाही”, असा दावाही बिट्टू यांनी केला. अटकेच्या वेळी चड्ढा यांच्या गैरहजेरीवर बिट्टू यांनी प्रश्न उपस्थित केला.
या वर्षी बिट्टू यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २७ फेब्रुवारीला त्यांच्यावर आणि भारत भूषण आशू यांच्यावर लुधियाना महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर गोंधळ निर्माण केल्याचा, तसेच आप सरकारच्या विरोधात निदर्शने करीत सरकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केल्यानंतर सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मार्चमध्ये लुधियाना पोलिसांनी काँग्रेस खासदार बिट्टू आणि त्यांच्या समर्थकांवर २५ जानेवारीला नूरपूर बेट गावात एका प्रकल्पाचे कामकाज थांबविल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा : ६२व्या वर्षी लग्न करणाऱ्या कुख्यात गुंडाच्या पत्नीला लोकसभेचं तिकीट?
लुधियाना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय तलवार म्हणाले, “कायद्यानुसार खरे काय ते समोर येईल. प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांना अटक केल्यानंतर ‘आप’चे नेतेही हेच म्हणायचे. त्यांनी न्यायालयावरही विश्वास ठेवला पाहिजे.”
दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने याउलट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, केजरीवाल यांच्या अटकेवरून असे दिसून येते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडिया आघाडीला घाबरले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युती आणखी मजबूत होईल.