वर्धा : डॉ. पंकज भोयर यांना मिळालेले मंत्रिपद इतरांच्या नाराजीचे कारण ठरत असले तरी यामुळे कुणबी-तेली वादाचा योग्य समन्वय साधल्या गेल्याचा तर्क मांडल्या जातो.
जिल्ह्यात वर्धा, आर्वी, हिंगणघाट व देवळी या चारही ठिकाणी भाजप आमदार निवडून आले. विधानसभेत १०० टक्के यश मिळाल्याने भाजप वर्तुळात आनंद आहे. पर्यायाने जिल्ह्यास मंत्रिपद मिळावे, अशी मागणी खुद्द जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हे वरिष्ठ नेत्यांकडे करून आले होते. पण मंत्रिपद अखेर लाभले. वर्ध्याचे आमदार भोयर यांची मंत्री म्हणून वर्णी लागताच जिल्हा भाजपमध्ये आनंद व नाराजी, अशा दोन्ही भावना उसळल्या.
एका आमदाराने तर शपथविधीसाठी कपडे पण तयार ठेवले होते. पण यादीत नाव न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करून टाकली. मंत्री झाले नाही म्हणून एका आमदाराने माजी खासदार रामदास तडस यांना फोन लावून विचारणा केली की, तुम्ही माझ्या नावाची शिफारस का केली नाही? तेव्हा तडस यांनी योग्य कोण ते पक्षाचे नेते ठरवतात. मी कोणाचे नाव दिले, नाही दिले याने काही फरक पडत नाही, असे सांगत तडस यांनी अधिक भाष्य टाळले. यामागे एक कारण आहेच. तडस यांनी डॉ. भोयर हे मंत्री व्हावे म्हणून दिल्लीत विनोद तावडे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्याकडे शिफारस केली होती. फडणवीस व बावनकुळे यांच्याकडे पण शिफारस केली होती. भोयर हेच का, अशी विचारणा केल्यावर एक तर जिल्हा मुख्यालय असलेल्या मतदारसंघाचे आमदार. जातीय राजकारणाचा ठप्पा नाही. सुसंस्कृत, शिक्षित व सहज उपलब्ध असलेला आमदार. कोणाच्या अंगावर तुटून पडत नाही. नाहक इतरांच्या राजकारणात नाक खुपसत नाही, अशी पावती तडस यांनी भोयर यांच्याबद्दल दिल्याचे शिष्टमंडळीतील एकाने सांगितले.
जिल्हाध्यक्ष गफाट म्हणाले की, नाराज होणे, समर्थकांनी राजीनामे देणे हे काही भाजपमध्ये खपवून घेतले जात नाही. असे प्रकार करू नका. कराल तर तुमचा नेता अडचणीत येईल. पक्षनेते जे ठरवितात ते मान्य करा. इतर ज्येष्ठ नेत्यांना संधी का मिळाली नाही, त्याचा अभ्यास करा.
दोन्ही समाजांना सोबत घेण्याची यशस्वी खेळी
वर्धा मतदारसंघ हा कुणबी व तेलीबहुल समजला जातो. या दोन्ही समाजास सोबत घेऊन चालण्याची खेळी भोयर यांनी यशस्वी केली आहे. तैलिक महासंघाचे अध्यक्ष असलेले माजी खासदार रामदास तडस हे भोयर यांच्या २०१४च्या पहिल्या उमेदवारीपासून ते आता मंत्रिपद मिळेपर्यंत त्यांची पाठराखण करीत आले आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मर्जीत डॉ. भोयर हे केव्हा व कसे जाऊन बसले, हे कोणालाच कळले नाही. स्थानिक पातळीवर भोयर यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांमध्ये तेली समाजाचे युवा गर्दी करून आहेत. त्यामुळे भोयर यांना मंत्रिपद दिले तर अधिकृतपणे कुणबी समाज व सार्वजनिकपणे तेली समाज खुश होईल, हे समीकरण पुढे आल्याचे जिल्हा नेते म्हणतात. समन्वयी राजकारणाचे भाजपमधील प्रतीक, हा निकष डॉ. भोयर यांना मंत्रिपदी नेण्यास पूरक ठरल्याची चर्चा होते.