सुहास सरदेशमुख
औरंगाबाद : विनायक मेटे यांच्या व्यसनमुक्ती लढ्याला बळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये येणे, त्या कार्यक्रमास पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे गैरहजर असणे, त्यानंतर काही दिवसांनी आमदार श्रीकांत भारतीय यांचे भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेणे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमधील औरंगाबादच्या सभेच्या कार्यक्रमात निमंत्रण प़त्रिकेत पंकजा मुंडे यांचे नाव न छापणे, रावसाहेब दानवे वगळता औरंगाबाद जिल्ह्यात वक्त्यांची कमतरता माहीत असूनही पंकजा मुंडे यांना केवळ दोनच मिनिटात भाषण आटोपा, अशी जाहीर सूचना देणे या राजकीय घटनांमागे वरिष्ठांची मर्जी आहे. अशी वातावरण निर्मिती केल्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत.
हेही वाचा >>> महाविकास आघाडीतील जागावाटपासाठी अजित पवारांचा तोडगा
‘ओबीसी’ आधारावर लोकसभा निवडणुका जिंकण्याची रणनिती राष्ट्रीय स्तरावर ठरविली जात असताना राज्यातील ओबीसी नेत्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ‘ओबीसी’च्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांचा प्रभाव अजूनही कायम आहे. गर्दी जमविण्याची आणि आपल्या भाषणांच्या आधारे समाजाला भावनिक आवाहन करू शकणाऱ्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांची ओळख आहे. असे असले तरी त्यांना पर्याय म्हणून डॉ. भागवत कराड यांचे नेतृत्व पुढे आणण्यात आहे. त्याला बळही दिले जात आहे. त्याच वेळी पंकजा मुंडे यांचे राजकीय महत्त्व कमी करण्यासाठी सुरू असणाऱ्या खेळींमध्ये अजूनही सातत्य कायम असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात जलसंपदा मंत्रालय काढून घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचे राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांना सत्तेतून सहकार्य मिळाले. त्याचा उल्लेख निवडणूक निकालानंतर पंकजा मुंडे यांनीच एका मुलाखतीमध्ये केला. त्यानंतर पक्ष नेतृत्वाच्या विरोधात आवाज उंचावणाऱ्यांचे एक संघटन उभे ठाकण्याचाही प्रयत्न पंकजा मुंडे यांनी करून पाहिला. पण ते प्रयत्न हाणून पाडण्यात आले.
हेही वाचा >>> शिंदे-कवाडे युतीचा राजकीय लाभ कोणाला?
पुढे अगदी उसतोडणी मजुरांचे नेतृत्वही पंकजा मुंडे यांच्याकडून सुरेश धस यांच्याकडे जावे, या प्रयत्नांना पक्षाच्यावतीने बळ देण्यात आले. आता त्या पुढच्या टप्प्यावरील खेळी सुरू असल्याचे दिसत आहे. बाहेरुन पक्षात घेतलेल्यांचा सन्मान आणि पक्षहितासाठी काम करणाऱ्यांना अपमानास्पद वागणूक या भाजपमधील वातावरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. दबक्या आवाजातील चर्चा काही महिन्यांपूर्वीपर्यंत समाजमाध्यमांतून उमटत असत. ते संदेश भाजपशिवाय अन्य पक्षीय नेत्यांनाही जाहीरपणे दिले जात असल्याने पंकजा मुंडे यांनी एमआयएममध्ये यावे , असे म्हणण्यापर्यंत ‘एमआयएम’ची मजल गेली आहे. मात्र, त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. नुकतेच एमआयएमचे नेते असदोद्दीन ओवेसी यांनी पंकजा मुंडे यांना ओबीसी हितासाठी एमआयएममध्ये येण्याचे आवाहन केले.