विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पंकजा मुंडे यांनी अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जाहीरपणे केले. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आल्यानंतर धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत आले. या चर्चेची कोंडीही सुरेश धस यांनीच फोडली. या दोन घटनानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोगस पीक विम्याचा विषय त्यांनी लावून घरल्याने मुंडे बहीण – भावा विरुद्ध भाजप आमदार सुरेश धस नवे रिंगण बीडच्या राजकारणात आखत असल्याचे चित्र राजकीय पटलावर निर्माण झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांनी निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी दूरध्वनी केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. भाजपचे आमदार आणि भाजपच्या नेत्या यांच्यातील हा संघर्ष अगदी वरच्या नेत्यांच्या कानी जाईल अशी रचना त्यात करण्यात आली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदारे आणि पवनउर्जा निर्मितीमधील कंपनीकडून दोन कोटी रुपयांच्या खंडणीचे प्रकरण चर्चेत आले. यामध्ये गुन्हेही दाखल झाले. त्याची चर्चा धनंजय मुंडे यांची कोंडी होईपर्यंत केली गेली.

आणखी वाचा-ज्येष्ठ मंत्र्यांना धक्का! महाजन, विखे-पाटील, मुंडे यांचे पंख छाटले

सुरेश धस मुंडे बहीण – भावा विरुद्ध सरळपणे मैदानात उतरल्याचे चित्र बीड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर निर्माण झाले. त्यांची ही कृती जातीय तेढ निर्माण व्हावी अशी असल्याचा आरोप आता मुंडे समर्थक करू लागले आहेत. त्यामुळे सुरेश धस यांच्यावरच कारवाई करावी अशी मागणी प्रदेश प्रवक्ते प्रवीण घुगे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. पक्ष नेत्यांच्या विरोधातील धस यांची वक्तव्ये शिस्तभंग करणारी असल्याचे घुगे यांनी म्हटले आहे.

एका बाजूला आरोप प्रत्यारोप होत असताना विधिमंडळ अधिवेशनाचा समारोप करताना बोगस पीक विम्याचा प्रश्न आमदार धस यांनी चर्चेत आणला. पालम तालुक्यातील दगडूबाई केंद्रे, अतुलराव गुट्टे या सादगिरवाडी ग्रामपंचायतीने आपल्या परिसरात बोगस पीक विमा नोंदल्याची तक्रार केल्याचे सांगितले. परळीचा बोगस पॅटर्न परभणी, धाराशिव जिल्ह्यापर्यंत कसा गेला हेही त्यांनी उलगडून सांगितले. यामुळे मुंडे बहीण – भावा विरुद्ध सुरेश धस असा नवा वाद राजकीय पटलावर उभा राहताना दिसत आहे. या वादाला निवडणुकीतील मतदाना दरम्यान घडलेल्या घटनांचे संदर्भ असल्याचे सांगण्यात येत आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सहसंबंधामुळे अजित पवार यांना प्रश्न विचारले गेल्याने सरकारचा कारभार सुरू होण्यापूर्वीच नवे वाद पटलावर येऊ लागले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde and dhananjay munde vs suresh dhas new controversy on political stage after elections print politics news mrj