छत्रपती संभाजीनगर – भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा बीडमधील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर लाेकसभा निवडणुकीतही दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने पंकजा यांच्या प्रचाराच्या ‘पालकत्त्वा’ची जबाबदारी एकप्रकारे हाताळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याही पुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहे. जिल्ह्याच्या राजकारणावरची पकड कायम ठेवण्यासह येत्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही गड राखण्याचे आव्हान आहे.
बीडमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा ६ हजार ५८५ मतांनी पराभव केला. बजरंग सोनवणे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून ६६ हजार ९४० मते मिळवली. तर पंकजा मुंडे यांना १ लाख ४१ हजार ७७४ एवढे मताधिक्य मिळाले. सोनवणे यांनी शहरातूनही जवळपास १८ हजार मते घेतली. तर पंकजा मुंडे यांना २६ हजार ८५९ मते मिळाली. मात्र, बजरंग सोनवणे यांनी परळी विधानसभा क्षेत्रात झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करून बोगस मतदान झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आणला. त्याच्या काही चित्रफितीही समाजमाध्यमावर प्रसारित झाल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्या चित्रफिती पत्रकार बैठकीत दाखवून राज्यभर बोगस मतदानाचा मुद्दा चर्चेत आणला. यावरून बीडमधील मतदानाबाबत राज्यभर उलट-सुलट चर्चा सुरू झाली. यानंतरही बजरंग सोनवणे यांचा विजय आणि पंकजा मुंडे यांचा पराभव हा चिंतनाचा भाग बनला आहे.
हेही वाचा – ‘वंचित’ आघाडीची मतांची टक्केवारी निम्म्यावर
हेही वाचा – नारायण राणेंच्या विजयामुळे ठाकरेंच्या गडाला सुरुंग
सोनवणे यांना परळीतून मिळालेल्या मतांमध्ये मराठा, मुस्लिम व काही प्रमाणात दलित मतपेढीचा समावेश असून मुस्लिम मते जवळपास एकगठ्ठा त्यांना मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना धनंजय मुंडे यांना मुस्लिम व दलित समुदायाची एकगठ्ठा मते मिळत आली आहेत. मात्र, या लोकसभा निवडणुकीमध्ये मतांसाठी अनेक मोहल्ला, वसाहतींमध्ये धनंजय मुंडे यांनी तळ ठोकूनही मुस्लिम मते पंकजा मुंडे यांच्या बाजूने वळवण्यात त्यांना यश येऊ शकले नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम, दलित मतांसह मराठा मतपेढीही तयार झाली आहे. ओबीसी मतपेढीचे चित्र निर्माण केले जात असले तरी त्यात वंजारी समुदायाशिवाय अन्य घटकांना फारसे जवळ केले जात नसल्याची एक सल दिसते आहे. ओबीसींमधील वंजाराशिवाय अन्य समुदायाची मतपेढी कायम राखणे, परळीत झालेली नागरी सेवेतील विकासात्मक कामे, त्याच्या दर्जासह स्थानिक पातळीवर कारभार पाहणारे ठराविक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे वर्तन, यावरून जनमाणसामध्ये धुमसत असलेली एकप्रकारची खदखद विधानसभा निवडणुकीच्यादरम्यान धनंजय मुंडे यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.