छत्रपती संभाजीनगर : पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि बऱ्याच दिवसापासून असणारा त्यांचा ‘राजकीय वनवास’ संपल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झाले आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या हे पंकजा मुंडे यांचे सर्वात महत्त्वाचे बलस्थान. ओबीसी मतांचे गणित जुळवून आणण्याची क्षमता ही त्यात पडणारी भर, प्रसंगी अंगी असणारा आक्रमकपणा कधी बलस्थान होतो तर कधी तीच उणीवही. एका घरात दोन उमेदवार हे सूत्र या पुढे वापरले जाणार नाही असे संकेत त्यांच्या उमेदवारीमुळे मिळाले आहेत. कॉग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करताना उणे होणारी भाजपची बाजू सावरुन धरणारी बाब म्हणूनही पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे.
राज्यात बीड वगळता अन्य लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपच्या उमेदवारांना ज्या पातळीवर विरोध करेल ती शक्यता बीड लोकसभेत कमीच. राष्ट्रवादीमधील शरद पवार यांच्या गटातून कोण उमेदवार हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच बाजूला असल्याने बीडच्या राजकारणात नजिकच्या काळात मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पंकजा मुंडे याच उमेदवार असतील, हे राजकीय हालचालींवरुन स्पष्ट होऊ लागले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सार्वजनिक व्यासपीठावर होणारे सहज संवाद, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे एकत्रित कार्यक्रम यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारणात भाजपची बेरीज नव्याने जुळली. बीड लोकसभा मतदारसंघात केजच्या नमिता मुंदडा, गेवराई लक्ष्मण पवार, सुरेश धस हे भाजपचे आमदार. अजित पवार यांच्याबरोबर युती झाल्याने परळीतून धनंजय मुंडे, आष्टीतून बाळासाहेब आसबे, माजलगावचे प्रकाश सोळंके, लक्ष्मण पवार, अमरसिंह पंडित, याशिवाय भाजपशी जवळीक असणारे जयदत्त क्षीरसागर असे सारे गणित बेरजेचे आहे. या बेरजेत आता उणेपणा आला तर तो मराठा आरक्षणातील ‘ सगेसोयरे’ या शब्दाच्या अंमलबजावणीसाठी निर्माण केलेल्या वातावरणाचा. या मतदारसंघात मराठा उमेदवारांना सत्तेत प्रमूखपद मिळत नाही, ही भावना तीव्र आहे. तरीही मराठा मतांचे ध्रुवीकरण विजयापर्यंत नेणारे ठरलेले नाही. पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत नाराजी आणि धूसफूस व्यक्त करणारे कार्यकर्ते आता हाती पुन्हा कमळ घेतील.
हेही वाचा… चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वाद शिगेला
हेही वाचा… नंदुरबारमधील पदमाकर वळवी यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे नुकसान किती ?
राजकीय वनवास १४ वर्षाचा नसावा असे वक्तव्य अलिकडेच पंकजा मुंडे यांनी केले होते. आता तुम्ही सर्व माजी लोकप्रतिनिधीकडे लक्ष द्या, असे म्हणत त्यांनी तुम्ही लोकसभेत लक्ष द्या, आम्ही तुमच्याकडे लक्ष देऊ असे म्हटले होते. आता त्यांच्या नावाची उमेदवार म्हणून भाजपने घोषणा केली आहे. डॉ. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी देण्यात आलेली ही उमेदवारी बीडमधील भाजपच्या आक्रमक कार्यकर्त्यांना भावणारी आहे. नव्या गणितांच्या आधारे मतदारसंघाचे गणित मांडताना ‘ मराठा’ मतांचे ध्रुवीकरण होणार का, या प्रश्नावर या मतदारसंघाचे गणित ठरू शकेल.