छत्रपती संभाजीनगर – बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पक्षाचे स्थानिक नेते रमेश आडसकर यांनी रविवारी केजमध्ये मेळावा आयोजित करून शक्तिप्रदर्शन केले. परंतु या मेळाव्याची चर्चा आडसकरांच्या शक्तिप्रदर्शनाऐवजी केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या अनुपस्थितीवरच सुरू आहे.
केजमधील मेळाव्याला तालुकास्तरावरील महायुतीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना प्रश्न विचारून उमेदवार आवडणाऱ्यांपैकी आहे का ? का बदलायचा, असा प्रश्न करून आपली उमेदवारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निश्चित केल्याचे आवर्जून सांगितले. सोबतच डाॅ. प्रीतम मुंडे यांना सलग तिसऱ्यांदा निवडून आणायचे स्वप्नही अधुरे राहिले असून त्यांनी चांगले काम केल्याचा पुनरुच्चार केला. उपस्थितांमध्ये एका ज्येष्ठ व्यक्तीला पंकजा मुंडे यांनी नाव काय म्हणून विचारले तेव्हा त्यांच्याकडून ‘पवार’ अशी ओळख सांगण्यात आली. त्यावर पंकजा मुंडे यांनी कोणते पवार आहात, असे विचारताच उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकली. या सर्व बाजूंनी केजमधील मेळाव्याची चर्चा रंगलेली असतानाच दुसरी चर्चा सुरू होती ती मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या अनुपस्थितीची. या मेळाव्याला आमदार नमिता मुंदडा या निमंत्रित होत्या की त्यांना डावलण्यात आले, का त्या स्वत:च मेळाव्याकडे फिरकल्या नाहीत, याची चर्चा मात्र, चांगलीच रंगत आहे.
मात्र, अक्षय मुंदडा यांना केजमधील प्रचारात सक्रिय होऊ नका, असा सल्ला स्थानिक वरिष्ठ नेत्यांकडून मिळाल्याचीही एक कुजबूज असून त्याचाही एक भाग म्हणून नमिता मुंदडा या मेळाव्याकडे फिरकल्या नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई परिसरात काही कोपरा बैठका पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ घेतल्याची माहिती आहे. या सर्व संदर्भाने नमिता मुंदडा आणि रमेश आडसकर यांच्याशी संपर्क केला. मात्र, संवाद होऊ शकला नाही.