छत्रपती संभाजीनगर : अजित पवार व त्यांचे सहकारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थेच्या काळात पंकजा मुंडे यांची आता ‘तीर्थ’यात्रा निघणार आहे. ४ सप्टेंबरपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात होईल. साडेतीन शक्तिपीठे आणि ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दोन महिने रजा घेऊन पुन्हा लोकांमध्ये मिसळण्याच्या पंकजा मुंडे यांच्या या तीर्थयात्रेला ‘संघर्ष यात्रे’चे वेष्टन असल्याचेच सांगण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षात निवडणुकीपूर्वी ‘संघर्ष यात्रा’ काढण्याचा रिवाज आहे. २०१४ मध्ये पंकजा मुंडे यांनीही यात्रा काढली होती. तेव्हा ही यात्रेची शक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागे उभे करण्यात भाजपचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांनी महत्त्वाची जबाबदारी निभावली होती. त्यानंतर भाजपमधील सत्तासंघर्षात बरेच पाणी पुलाखालून गेल्यानंतर पंकजा मुंडे यांचे देवदर्शन राजकीय अर्थानेच पाहिले जात आहे.

हेही वाचा – खरा ‘बॉस’ कोण? नवीन आदेशामुळे सरकारी कामकाज नियमावलीचा भंग

बीड येथील अजित पवार यांच्या ‘उत्तरदायीत्व’ सभेसाठी धनंजय मुंडे यांनी गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्या शक्तीप्रदर्शनामुळे धनंजय मुंडे यांचा जिल्हाभर राजकीय प्रभाव निर्माण होऊ शकतो, असे त्यांचे समर्थक सांगू लागले आहे. ज्या पद्धतीने बीड येथे गर्दी जमविण्यात आली ती लोकसभा मतदारसंघात प्रभाव निर्माण करणारी होती, असा दावा केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या छायाचित्राच्या पाठिशी संसदेचे छायाचित्रही लावण्यात आले होते. अजित पवार यांच्या स्वागतानंतर जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीत सारे काही भाजपच्या बाजूने उभे ठाकेल, अशी चर्चा घडवून आणली जात आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचा दौराही ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – भाजपाकडून ‘इंडिया’ आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न; जागावाटपावरून वाद नाहीत; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

पंकजा मुंडे यांचा गेल्या काही वर्षांत सुरू असणारा पक्षाअंतर्गत संघर्षही मोठा आहे. राष्ट्रवादीबरोबरच्या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर भाजपमधील अस्वस्थ वर्ग पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पूर्वी सत्ताधारी गटातील एक वर्ग मुंडे यांच्या समर्थकांना सतत डिवचण्याचा प्रयत्न करीत असे. आता तो वर्ग या ‘तीर्थ’यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांचा संघर्ष यात्रा ते तीर्थ यात्रा असा प्रवास मात्र सध्या राजकीय पटलावर चर्चेत आला आहे. पहिल्या टप्प्यात एकनाथ खडसे, महादेव जानकर, राम शिंदे यांच्यासह एक मोठा चमू पंकजा मुंडे यांनी बांधण्याचा प्रयत्न केला होता. पुढे त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या समर्थकांकरवी हा गट निष्प्रभ ठरविला. परळी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पुन्हा विधिमंडळाच्या राजकीय पटलावर पंकजा मुंडे यांनी यावे यासाठी बरेच प्रयत्न झाले. पण त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले. अगदी उसतोड कामगारांच्या संघटनांचे नेतृत्व आमदार सुरेश धस यांच्याकडे देण्यात आले. भाजप ओबीसीच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी डॉ. भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले. रमेश कराड यांना उमदेवारी दिल्यानंतर ते आमदार झाले. पण पंकजा मुंडे यांचे नाव विधान परिषद निवडणुकीत चर्चेत आणले जायचे आणि ते नंतर कापले जात. याची खंत स्वत: व्यक्त केली. त्यानंतर त्या तीर्थाटनास चालल्या आहेत.

Story img Loader