उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला शनिवारी बीडमध्ये हजेरी लावली. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या घरीही  भेट देऊन पक्षाच्या आमदारांबरोबर चर्चा केली. पण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडेसह मुंडे भगिनी समर्थक पक्षनेतृत्वाच्या दौऱ्याकडे फिरकले नाहीत. त्यामुळे भाजप अंतर्गतचा कलह ठळकपणे दिसून आला.

हेही वाचा- राज्यासाठी धक्कादायक राजकीय घटनांचे सरते वर्ष, राजकीय लढाई न्यायालयात

भाजप महायुती घटक पक्षातील शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांनी  काही वर्षांपासून ३१ डिसेंबरला व्यसनमुक्ती कार्यक्रम सुरू केला होता. मेटे यांच्या अपघाती निधनानंतर यावर्षी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यात स्थानिक पातळीवर  मतभेद झाले होते.  देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत विनायक मेटे यांचे स्वागत स्वीकारल्यामुळे आणि त्यांना सहकार्य करत असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त करत यात्रा अर्ध्यात सोडून दिली होती.  विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा यांनी पक्षाच्याच नेत्यांनी विरोधकांना रसद पुरवल्याचा आरोप केल्यानंतर मुंडे समर्थकांनी समाजमाध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टीकेचे लक्ष केले होते.

हेही वाचा- शिंदे गटात अस्वस्थता? दीपक केसरकर म्हणाले, “सत्तारांना किती गांभीर्याने…”

‘इच्छा असतानाही येता आले नव्हते’

‘इच्छा असतानाही येता आले नव्हते’ दिवंगत विनायक मेटे यांनी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम सुरू केल्यानंतर दोन वेळा येण्याचे निश्चित होऊनही येता आले नाही. ज्योतीताई मेटे यांनी यावेळी निमंत्रण देताना व्यसनमुक्तीचा कार्यक्रम मी पुढे चालवत आहे, तुम्ही यावे. पण काही अडचण असेल तर प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री आले तरी चालतील, असे सांगितले होते. मात्र, यावेळी मी यायचे हे निश्चित करून आलो. पण मेटेसाहेब नाहीत. अशी खंत व्यक्त करून ज्योती मेटे व शिवसंग्रामला पूर्ण ताकदीने मदत करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Story img Loader