सुहास सरदेशमुख
‘संकटानो तुमची लायकी नाही, मी शरण यायला. सोसेल तुमचे घाव पण घायाळ होणार नाही. छाताडावर उभी राहील हे तुम्हालाही कळणार नाही’ अशा काव्यात्म शैलीत राजकीय विरोधकांना आव्हान देत गोपीनाथ गडावरून पक्षांतर्गत दबावाचे आक्रमक राजकारण कायम ठेवण्याचा पवित्रा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. आपल्याला वगळून ओबीसी राजकारणाची नवी चौकट आखण्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे.
मराठवाड्यातील राजकारणातून आणि भाजपच्या राजकारणातून पंकजा मुंडे यांना वजा करण्याचे नवे गणित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याचे गेल्या काही काळात वारंवार दिसल्याचे पंकजा मुंडे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता ओबीसी मोट बांधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरून नेते आपल्या बाजूने उभे होत असल्याचा संदेश प्रदेश भाजपपर्यंत पोहचविण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील कार्यक्रम घेतला.
बीड जिल्ह्यातील राजकारण ‘माधव’ सूत्रात बांधण्यात वसंतराव भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली काम झाले. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी या सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक राजकीय नेतृत्व दिले. त्यातून भाजपच्या मागे एक शक्ती उभी करण्यात त्यांना यश आले. पुढे हेच सूत्र पंकजा मुंडे यांनीही कायम ठेवले. महादेव जानकर, भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असणारे नेते एकनाथ खडसे यांच्यासह एक मोठा गट त्यांनी उभा केला. पक्षांतर्गत नाराज असणाऱ्या गटाचे नेतृत्व आपल्याकडे असावे असा पंकजा मुंडे यांचा प्रयत्न होता.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या राजकारणाला छेद देत डॉ. भागवत कराड आणि लातूरचे रमेशअप्पा कराड यांना पुढे आणले. ते दोघेही परळी येथील कार्यक्रमास उपस्थित नव्हते हे विशेष. या दोन्ही कराडांनी ओबीसीचे नेतृत्व आपल्याकडे असावे यासाठी खासे प्रयत्न केले नसले तरी मराठवाड्यात पंकजा मुंडे यांना पर्याय उभे करण्याची प्रक्रिया पद्धतशीरपणे आखली गेली. त्यामुळे त्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आक्रमक असणे ही ओळख पंकजा यांनी कायम ठेवली. संकटांनो तुमची लायकी नाही यासह त्यांनी केलेली शब्दपेरणी नक्की कोणत्या संकटाकडे दिशानिर्देश करणारे आहेत, कोण घाव करते आहे आणि त्या सोसताहेत पण घायाळ होत नाहीत, कोणाच्या छाताडावर उभे राहून त्यांना पुन्हा राजकारण करायचे आहे, असे नवे प्रश्न त्यांनी भाषणातून जन्माला घातले आहेत. या शब्दांचा रोख विरोधकांऐवजी पक्षांतर्गत अधिक होता, हे कार्यकर्त्यांनाही कळते. त्यामुळे दबावाच्या राजकारणातून पद किंवा नवे काही बदल झाले नाही तरी चालतील पण कार्यकर्ते व समर्थकांची गर्दी कायम राहिली पाहिजे अशी खेळी पंकजा यांनी गोपीनाथ गडवरील कार्यक्रमातून केल्याचे दिसून आले.
ओबीसीच्या बांधणीसाठी प्रदेशस्तरावरून होणाऱ्या प्रयत्नांत पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले. मुंबईतील ओबीसी आरक्षणाच्या मोर्चातही त्या दिसल्या नाहीत. त्या या मोर्चात आवर्जून याव्यात असे प्रयत्नही झाले नव्हते. त्यामुळे बीड येथील कार्यक्रमात ओबीसीची मोट बांधण्याचा भाग म्हणून राष्ट्रीय स्तरावरील नेत्यास म्हणजे शिवराजसिंह चौहान यांना खास आमंत्रण देण्यात आले. तेही परळी येथील कार्यक्रमास हजर राहिल्याने राष्ट्रीय पातळीवरील नेते आपल्या बाजूने उभे राहत आहेत असा संदेशही त्यांनी प्रदेश भाजपला दिला आहे.
विधान परिषदेची बांधणी?
‘सगळे जण विचारत आहेत, तुमचे भवितव्य काय?, उद्या काय होणार ? मला माझी चिंता नाही. पराभवाचेही सोने करण्याची पुण्याई कोणाकडे आहे. पराभवामुळे खूप शिकले. दिल्लीला जाता आले. काय मिळेल यापेक्षा मिळालेल्या संधीचे सोने करणे हे गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. त्यामुळे राजकारणात कोणी कोणाचे भविष्य घडवू किंवा बिघडवू शकत नाही, हे जनतेच्या हातात असते, असे विधान करत पंकजा मुंडे यांनी आपला आक्रमक बाणा पुन्हा दाखवला. त्यामुळे विधान परिषद मिळाली नाही तरी राष्ट्रीय स्तरावर सक्रीय होऊन मराठवाड्यात प्रभाव दाखवण्याची तयारी त्यांनी केल्याचे दिसत आहे.