उमाकांत देशपांडे
मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना महाराष्ट्रात महत्वाची जबाबदारी हवी असून पक्षश्रेष्ठींनी मात्र त्यांच्या या मागणीची दखल घेतलेली दिसत नाही. पंकजा यांना परळीऐवजी अन्य मतदारसंघाचाही पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजा यांनी सात जुलै रोजी दोन महिन्यांच्या सुटीवर जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. सध्याच्या राजकारणाला कंटाळून सुटीवर जात असून या काळात विचार करून पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेण्याचे जाहीर केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील सत्तेत सामील झाल्याने पंकजा यांच्या बीड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे भाजपमध्ये आधीच नाराज असलेल्या पंकजा यांनी थेट दोन महिन्यांच्या सुटीचा निर्णय जाहीर केला होता.

आणखी वाचा-वर्षा गायकवाड यांच्यासमोर कडवे आव्हान

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा यांचा पराभव केला. आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर असल्याने जागावाटपात ही जागा धनंजय मुंडेंसाठी भाजपला सोडावी लागेल. धनंजय यांनी परळीच नव्हे, तर बीड जिल्ह्यात वर्चस्व वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. परळीमध्ये कार्यालये सुरू करून व्यापक जनसंपर्क आणि स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती व अन्य संस्थांमधील राजकारणात लक्ष घालायला सुरूवात केली आहे. राजकीय भवितव्याला आव्हान निर्माण झाल्याने पंकजा अस्वस्थ आहेत. पंकजा यांचा पराभव झाल्याने त्यांच्याबाबत भाजपला आता कोणताही धोका पत्करायचा नसून त्यांच्यासाठी जिल्ह्यात सुरक्षित विधानसभा मतदारसंघ किंवा विधानपरिषदेसाठी विचार केला जाण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ नेत्याने ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले.

आणखी वाचा-उदय सामंत यांचे नारायण राणे यांनाच आव्हान

पंकजा यांनी सुटीचा निर्णय जाहीर केल्यानंतरही राष्ट्रीय कार्यकारिणीची फेररचना करताना त्यांचे स्थान अबाधित ठेवण्यात आले. त्यांचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फारसे सख्य नसल्याने त्यांच्याशी काही केंद्रीय नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा केली. त्यानंतर त्या संघटनेच्या कामासाठी अन्य राज्यात जाऊनही आल्या. त्या प्रदेश सुकाणू समितीत असल्या तरी निर्णय प्रक्रियेत त्यांना फारसे स्थान नाही. ओबीसी समाजाच्या नेत्या असल्याने राज्यातही महत्वाची जबाबदारी असावी, असे त्यांना वाटत असले, तरी फडणवीस आणि केंद्रीय नेत्यांनी मात्र त्याची फारशी दखल घेतलेली नाही. त्यांची बहीण प्रीतम मुंडे या खासदार असून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार असलेल्या दोघी बहिणींना भाजप उमेदवारी देणार का, याबाबत प्रश्न चिन्ह असून राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने वेगवेगळे पर्याय अजमावले जातील, असे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde wants important responsibility in maharashtra print politics news mrj
Show comments