उल्हासनगर शहराच्या राजकारणात प्रभाव पडणारे कलानी कुटुंब ज्या पक्षाच्या पारड्यात आपले वजन टाकतात ते पारडे जड मानले जाते. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नांत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली अभूतपूर्व फूट ही कलानी कुटुंबाचे महत्त्व वाढवून गेली असून त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट सक्रिय होते. आता पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी सहकुटुंब उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने कलानी कुटुंबाचा कल त्यांच्याकडे असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

देशात नामांकित वस्तूंची अस्सल वाटणारी बनावट नक्कल करण्याची कला असल्याने उल्हासनगर शहर प्रसिद्ध झाले. मोठी बाजारपेठ असलेल्या उल्हासनगर शहरात सुरुवातीपासूनच सिंधी समाजाचा प्रभाव राहिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भाजप शहरातील प्रमुख पक्ष आहेत. मात्र नव्वदच्या दशकापासून शहरात व्यक्तिकेंद्रित राजकारण वाढले आणि त्यात सुरेश उर्फ पप्पू कलानी यांचे महत्त्व अधोरेखित झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाई किंवा अपक्ष अशा सर्वच गटातून कलानी यांचे महत्त्व होते. गुन्ह्याच्या शिक्षेमुळे सक्रिय राजकारणातून पप्पू कलानी काही काळ दूर राहिल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती कलानी आणि पुत्र ओमी कलानी यांनी राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला. एकेकाळी शिवसेना आणि भाजप हे कलानी यांचे विरोधक म्हणून ओळखले जायचे. मात्र २०१७ मध्ये शिवसेनेला बाजूला सारून सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कलानी गटाला आपल्यासोबत घेतले. या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरत राजवानी उर्फ गंगोत्री यांनी टिकवला. भाजपने पालिकेची सत्ता मिळवत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले. मात्र काही राजकीय आश्वासने अपूर्ण राहिल्याने कलानी गटाने भाजपची साथ सोडत शिवसेनेला महापौरपदासाठी मदत केली. त्यानंतर भाजप आणि कलानी गटातील वाद विकोपाला गेला. सत्तेची समीकरणे बदलताच कलानी पुन्हा स्वगृही परतले. आता पप्पू कलानी स्वतः राजकारणात सक्रिय झाल्याने कलानी गटाचा दबदबा पुन्हा जाणवू लागला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा – मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा ‘कँडी क्रश’ खेळतानाचा फोटो व्हायरल; भाजपाची सडकून टीका!

अजित पवार थेट सत्तेत सहभागी होऊन शिवसेना भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. परिणामी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संभ्रमात पडले. उल्हासनगरच्या कलानी गटाने अजित पवार यांच्या शपथविधीला हजेरी लावल्याची चर्चा होती. तर शरद पवार यांच्या सभेतही कलानी समर्थक हजर होते. त्यामुळे कलानी यांची नक्की भूमिका काय असा प्रश्न पडत होता. त्यात शरद पवार यांच्या गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहीत पवार यांनीही कलानी कुटुंबीयांची त्यांच्या घरी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. मात्र दोन दिवसांपासून ओमी कलानी आणि कुटुंबीय अजित पवार यांच्या भेटीला गेल्याचे छायाचित्र प्रसारित झाल्यापासून पुन्हा वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. कलानी कुटुंबीयांचा अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा असल्याचेही बोलले जाते आहे. त्यामुळे कलानी कुटुंब पुन्हा सत्तेच्या जवळ अजित पवारांच्या गटात गेल्याने शरद पवार यांच्या गटाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा – रायगडमध्ये राष्‍ट्रवादी – शिवसेना शिंदे गटात दिलजमाई?

सत्तेच्या जवळ राहण्याचे धोरण ?

कलानी कुटुंबीयांचे राजकरण गेल्या काही वर्षांत सत्तेच्या जवळ जाणारे राहिलेले आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा सर्व निवडणुकांमध्ये कलानी कुटुंबाची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळाली आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी, नंतर भाजप, मग शिवसेनेसोबत असलेली महाविकास आघाडी आणि आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा कलानी कुटुंबीयांचा प्रवास राहिलेला आहे. लोकसभेत शिवसेनेला, विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पालिका निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा दिल्याचा कलानी कुटुंबाचा इतिहास आहे.

Story img Loader