छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ( उद्धव ठाकरे) पक्षातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील तानाजी सावंत यांच्या विरोधात परंडा मतदारसंघात उमेदवार कोण याचा पेच कायम असल्याने गुरुवारी स्पष्ट झाले. जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीमध्ये रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांचे नाव पुढे आले. पण उमेदवारींच्या यादीतील हे नाव पुढे ‘ सामना ’ मुखपत्रातून जाहीर झाले नाही. त्यांच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीमध्ये घोळ असल्याचे स्पष्ट झाले. परंडा मतदारसंघाबरोबरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघातही उमेदवार निवडीचा पेच उद्धव ठाकरे यांना सोडवता येत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये ‘ आयात ’ उमेदवारांवर भर असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काग्रेस ( शरद पवार ) यांच्या पक्षाकडून परंडा विधानसभेवर दावा सांगण्यात आला असून राहुल मोटे यांच्यासाठी जागा प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. परंडा मतदारसंघाने शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंंबाळकर यांच्या पदरात ६३ हजारांहून अधिकचे मताधिक्य टाकले होते. त्यामुळे परंड्यांचा तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे. धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर म्हणाले, ‘ जाहीर करण्यात आलेली उमेदवाराची निवड अत्यंत योग्य आहे. अलिकडेच परंडा विधानसभेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन झाले होते. त्यांच्या घरातील तरुण कार्यकर्त्यांस उमेदवारी द्यावी अशी आम्हा सर्वांची इच्छा होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ही बाब मान्य केली होती. मात्र, आता ही जागा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. वास्तविक तानाजी सर्वांची ताकद कोठे आहे, हे साऱ्या मतदारसंघातील व्यक्तींना माहीत आहे. त्याच्यावर मात करण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव हेच उमेदवार असावेत अशी विनंती आम्ही साऱ्यांनी केली आहे. आता आघाडीचे नेते निर्णय घेतील.’

हेही वाचा : Congress NCP Nomination Applications : यादी जाहीर होण्याआधीच काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज

परंड्यात जसा पेच निर्माण झाला आहे तसाच तो पैठणमधील उमेदवारीवरुनही असल्याचे सूत्रांनी सांगितले. पैठण मतदारसंघात शिवसेनेच्या ( एकनाथ शिंदे ) खासदार संदीपान भुमरे यांचे सुपूत्र विलास भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघात उमेदवारांचा शोध घेण्यासाठी शिवसेना ( उद्धव ठाकरे) गटाने बरीच कसरत केली. पहिल्या टप्प्यात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दत्ता गोर्डे यांना शिवबंधन बांधले. पण त्यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये साखर कारखांनदार सचिन घायाळ यांना शिवसेना ( उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे उमेदवारी देताना पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Badnera Vidhan Sabha Constituency : बडनेरा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्‍याने प्रीती बंड यांचे समर्थक आक्रमक

शिवसेनेच्या पहिल्या यादीतील ‘बाहेर’चे वर्चस्व ?

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आमदार कैलास पाटील ( धाराशिव ), डॉ. राहुल पाटील ( परभणी ), उदयसिंग राजपूत ( कन्नड ) या तीन आमदारांना पुन्हा उमदेवारी देण्यात आली. याशिवाय देण्यात निवडण्यात आलेले उमदेवार हे अन्य पक्षातून शिवसेनेमध्ये आले आहेत. यातील बहुतांशजण भाजपमधून आलेले आहेत. सिल्लोडमधून उमेदवारी देण्यात आलेले सुरेश बनकर, वैजापूरमध्ये दिनेश परदेशी, औरंगाबाद पश्चिम मधून राजू शिंदे, औरंगाबाद मध्य मधील किशनचंद तनावणी यांचा प्रवासही ‘शिवसेना – भाजप – शिवसेना ’ असा झालेला. संतोष बांगर यांच्या विरोधात कळमनुरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेले संतोष टारफे हे कॉग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलेले. उमेदवारी देण्यात आलेल्यांमध्ये गंगाखेडमधील विशाल कदम हे गेल्या काही वर्षापासून शिवसेनेतच काम करत आहेत.