बिपीन देशपांडे
औरंगाबाद : परंडा मतदारसंघात शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे समर्थन वाढते राहावे, यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे बाणगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघ बांधणीत गुंतले आहेत. लक्ष्मीपुत्र अशी परंडा मतदारसंघातील ओळख असणाऱ्या सावंत यांच्या विरोधात परंड्यात ज्ञानेश्वर पाटील हेही मैदानात उतरले आहेत. एका बाजूला राहुल मोटेंकडून साखर पेरणी तर दुसरीकडे फटकळ तानाजी सावंताच्या विरोधात ज्ञानेश्वर पाटील असे राजकीय चित्र आहे.
तानाजी सावंत यांचे मतदारसंघात येणे म्हणजेही हस्तिदंती अंबारीतून आल्यासारखे. उंचावरूनच मतदारांना हात दाखवून निघायचे. पण प्रा. सावंत यांनी राहुल मोटे यांना पराभूत केले. तत्पूर्वी ते तीन वेळा परंडा मतदारसंघातून निवडून आले. दुष्काळी परंड्याचे राजकारण मात्र साखरेभोवती फिरते. मोटे यांचा स्वभाव तसा मितभाषी. तसे कोणावर टीका करून पुढे जाण्यात त्यांनी कधीच रस दाखविला नाही. आपण आणि आपला मतदारसंघ या परिघाबाहेरही ते गेले नाहीत. पद्मसिंह पाटील व राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी राहुल मोटे हे शरद पवार यांचे समर्थन करीत राष्ट्रवादीमध्येच थांबले. ते खरे तर अजित पवार यांच्याशी असलेल्या जवळिकीमुळे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक गावांच्या रस्त्याचे प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. विशेषतः अजित पवार यांचा कारखाना म्हणून ओळख असलेल्या बाणगंगा साखर कारखाना परिसरातील गावांमध्ये मोटे यांनी रस्त्यांची कामे करण्यावर भर दिला होता. त्यांच्या पत्नी वैशाली मोटे याही राष्ट्रवादीच्या विभागीय पातळीवरील मिळालेल्या पदाच्या माध्यमातून मतदारसंघात बांधणीच्या कामात सक्रीय आहेत. अशी राष्ट्रवादीची पेरणी सुरू असताना शिवसेनेत फूट पडली.
हेही वाचा… मंडलिक-महाडिक मनोमीलन, तर माने-शेट्टी यांच्यात संघर्ष, कोल्हापुरात नवीन राजकीय समीकरणे
तानाजी सावंत यांच्या रूपाने मोठा नेता बाहेर पडला असला तरी मूळ शिवसैनिक आहे तिथेच आहे, असा ज्ञानेश्वर पाटील यांचा दावा आहे. परंडा मतदारसंघातही ‘खान की बाण’ याच ध्रुवीकरणातून राजकारण तापवले जाते. शिवसेनेतील फुटीमुळे त्यात फरक पडेल असाही तानाजी सावंतांच्या समर्थकांचा दावा आहे. महाविकास आघाडीत मंत्रिपदी वर्णी न लागल्याने सुरुवातीपासूनच नाराज असलेले प्रा. तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. मधल्या काळात भाजपशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न होताच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांच्या नावांच्या संभाव्य यादीत प्रा. सावंत यांचे कायम पुढे असते. महायुतीच्या काळात जलसंधारणसारख्या विभागाचे मंत्रिपद भूषवलेल्या प्रा. सावंत यांना शिवसेना नेतृत्वाने काहीसे बाजूला ठेवून पाहिल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया किंवा उघडपणे केलेल्या टीकेमुळे शिवसेनेसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता भैरवनाथ शुगरकडून किफायतशीर व रास्त भाव देणे अद्याप बाकी असल्याने तानाजी सावंतांविषयी रोषही आहेच. त्यातच आता राहुल मोटे यांनी साखर पेरणी सुरू केली आहे. परंडा मतदारसंघाच्या राजकारणात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शंकरराव बोरकर ही दोन प्रमुख चेहरेही आहेत. बोरकर यांचे व्यवसाय, उद्योगाच्या निमित्ताने वास्तव्य मुंबईत असल्याने ते मातोश्रीच्याही संपर्कात असतात़ या पूर्वी दोन विधानसभा निवडणुकीत बोरकर यांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता. त्यावरून जाती-पातीचे राजकारण चर्चेत आले.
हेही वाचा… कुरघोडीच्या राजकारणाने नागपूर महापालिका निवडणुकीचा खेळखंडोबा
२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने मोटे यांच्यापुढे धनशक्तिवान पण मराठा समाजातील नेता म्हणून प्रा. सावंत यांना उतरवले होते. सावंत हे विजयी झाले. यामध्ये मूळ शिवसैनिक आणि सेनेचे कधीकाळी आमदारही राहिलेले ज्ञानेश्वर पाटील यांचे नेतृत्व मागेच पडत गेले. परंतु प्रा. सावंत हे शिंदे गटात गेल्याची घडामोड ज्ञानेश्वर पाटील यांच्यासाठी सुंठे वाचून खोकला गेल्यासारखी आहे. अलिकडेच पाटील हे आजारी असताना त्यांना थेट उद्धव ठाकरे यांच्याकडूनच विचारपूस झाली. थेट मातोश्रीवरून त्यांना फोन आल्याची मतदारसंघात चर्चा झाली. पण सावंतांच्या विरोधात आता मतदारसंघात ‘साखर पेरणी’चा प्रयोग सुरू झाला आहे.