परभणी : वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभा मतदारसंघासाठी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र एका रात्रीतून उगले यांची उमेदवारी रद्द झाली आणि वंचितने हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना आता परभणी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून उतरवले आहे. बुधवारी दिवसभरात बऱ्याच घडामोडी घडल्या आणि त्यानंतर डख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पाऊस पाण्याचे हवामान सांगणाऱ्या डख यांच्या उमेदवारीने राजकीय हवामानाची रंगतही वाढली आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने खासदार संजय जाधव तर महायुतीच्या वतीने महादेव जानकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्यानंतर आणखी चर्चित व्यक्तींपैकी कोणाचा अर्ज दाखल होऊ शकतो याबाबत उत्सुकता होती. विशेषतः वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेक नावे चर्चिली जात होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आलमगीर खान यांनी परभणी मतदारसंघातून दीड लाख मते घेतली होती मात्र यावेळी बाबासाहेब उगले या नवख्या उमेदवाराची उमेदवारी वंचितने सुरुवातीला जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आलमगीर खान यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
हेही वाचा – भाजपा मंत्र्याच्या मुलाची जोडप्याला मारहाण; मध्य प्रदेशमध्ये पक्ष का आलाय अडचणीत?
बाबासाहेब उगले यांचे नाव तसे परभणीसाठी अपरिचित होते. त्यामुळे काल दिवसभर त्यांच्या नावाचा शोध घेतला जात होता. माजी मंत्री गणेश दुधगावकर यांचे चिरंजीव समीर यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. आपल्या अपक्ष उमेदवारीसाठी वंचितने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा समीर यांनी आंबेडकर यांच्याकडे व्यक्त केली मात्र तसे करता येणार नाही असे आंबेडकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे पंजाब डख यांनीही प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. डख यांच्या भेटीनंतरही वंचितने उगले यांची उमेदवारी जाहीर केली होती मात्र गुरुवारी त्यात बदल झाला.
सुरुवातीला जाहीर करण्यात आलेली उमेदवारी रात्रीतून रद्द करून वंचितने डख यांना उमेदवार म्हणून निश्चित केले याबद्दल येथे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. परभणी लोकसभा मतदारसंघातील लढत थेट होऊ नये यासाठी बरेच प्रयत्न होत आहेत. त्यातच डख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारसंघातील जनतेला बदल हवा आहे. परभणीसाठी औद्योगिक वसाहत, पाणी यासह विकासाचे अनेक मुद्दे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे शेतीमालाच्या हमीभावाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण निवडणूक लढवत आहोत, असे डख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांना सांगितले.
हेही वाचा – घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी
ढगांची दिशा आणि बदलत्या वाऱ्याचे भाकीत सांगणाऱ्या डख यांचे नाव शेतकऱ्यांमध्ये परिचित आहे. विशेषतः पावसाचा अंदाज व्यक्त करणारे हवामान अभ्यासक म्हणून ते परिचित आहेत. डख यांच्या उमेदवारीने राजकीय वाऱ्याची दिशा बदलणार काय याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे.