परभणी : माढ्यातून महाविकास आघाडीमार्फत लोकसभा लढवण्याचे जाहीर करून काही तासांतच ‘यु टर्न’ घेत रासपचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता परभणी मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात महायुतीतील स्थानिक नेत्यांचा विसंवाद दिसून आल्यानंतर जानकर यांच्या नावाचा पर्याय पुढे आला असला तरी जानकर यांच्यासाठी सर्व स्थानिक नेत्यांची मोट बांधण्याची कसरत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना करावी लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा परभणीत पार पडला होता. या मेळाव्यात जानकर यांनी आपण महायुती व महाविकास आघाडी या दोघांनाही प्रस्ताव दिलेले आहेत असे सांगितले. त्यानुसार माढा किंवा परभणी या दोनपैकी एक जागा आपण लढवणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले होते. एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत छोट्या पक्षांना वापरून घेण्याचे राजकारण केले असा आरोपही केला होता. शनिवारी जानकर यांचे महाविकास आघाडीसोबत जाण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे माध्यमातून स्पष्ट झाले होते. एवढेच नाही तर खुद्द जानकर यांनीही आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून माढा ही लोकसभेची जागा लढवत असून या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ असेही सांगितले होते. अवघ्या काही तासांतच जानकर यांनी आपला पवित्रा बदलला. जानकर यांनी आपण महायुतीसोबत जाणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला एक लोकसभेची जागा देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. दरम्यान महायुतीमार्फत गेल्या काही दिवसांपासून परभणीत उमेदवारीचा घोळ चालू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर यांच्या नावाची चर्चा चाललेली होती तर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हेही प्रयत्नशील होते.

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच

हेही वाचा – रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

विटेकरांनी गाठीभेटी सुरू केल्या होत्या तर बोर्डीकरांनीही लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रचार प्रमुख म्हणून बैठकांचा धडाका लावला होता. विशेषतः गेल्या दोन-तीन दिवसांत विटेकर की बोर्डीकर ही चर्चा सुरू झाली. त्यातच जानकर यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना आता महायुतीकडून परभणीची जागा दिली जाईल अशी चर्चा जोर धरत आहे. जानकर यांच्या पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे आमदार आहेत. स्थानिक पातळीवर कोणाला उमेदवारी द्यायची असा पेच गेल्या काही दिवसांत निर्माण झाला असताना जानकर यांना महायुतीची उमेदवारी मिळाली तर स्थानिक पातळीवरही कोणताच वाद राहणार नाही असा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. आमदार रत्नाकर गुट्टे (रासप, गंगाखेड), आ. मेघना बोर्डीकर (भाजप, जिंतूर), आ. बबनराव लोणीकर (भाजप, परतुर) हे तीन मतदारसंघ महायुतीच्या आमदारांच्या ताब्यात आहेत. याशिवाय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेली हटकर धनगर समाजाची मते, ओबीसी मतांचे होणारे ध्रुवीकरण या बाबी जानकर यांच्या उमेदवारीसाठी महायुतीने ग्राह्य धरल्या आहेत असे समजते.

हेही वाचा – महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अधिकच किचकट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जानकर यांना महाविकास आघाडीपासून अलग करून महायुतीत घेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे जास्त आग्रही होते. त्यांनीच जानकर यांच्याशी सर्वप्रथम संपर्क साधला. बारामतीची जागा सुरक्षित करण्यासाठी जानकरांना सोबत घेण्याची अपरिहार्यता त्यांच्यापुढे होती. जानकर यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच त्यांची परभणीची उमेदवारी घोषित करण्याऐवजी स्थानिक नेत्यांशी चर्चेचे सोपस्कार पार पाडण्याची तांत्रिकता उरकून टाकू आणि त्यानंतर ही उमेदवारी जाहीर करू असे महायुतीच्या नेत्यांमध्ये ठरले. अचानक जानकर यांची उमेदवारी जाहीर झाली तर स्थानिक पातळीवर आधीपासून तयारी करत असलेले राजेश विटेकर नाराज होतील. त्यामुळे आधी स्थानिकच्या सर्व नेत्यांची मानसिकता तयार करायची असेही ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – भाजपने उमेदवारी नाकारताच माजी मंत्र्याच्या कन्येचा थयथयाट

जानकर यांच्या नावाची चर्चा येथे सुरू झाल्यानंतर परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी कोणत्याही परिस्थितीत परभणीची जागा भाजपलाच सुटली पाहिजे आणि प्रबळ अशा स्थानिक नेत्यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या ३५ वर्षांपासून परभणीत शिवसेनेचे वर्चस्व आहे, आता जर भाजपच्या नेतृत्वाने लोकसभेच्या जागेबाबत निर्णय चुकवला तर पुन्हा उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना आमच्या छातीवर बसेल असेही लोणीकर म्हणाले आहेत. अप्रत्यक्षरीत्या त्यांनी जानकर यांच्या उमेदवारीला नकारघंटा दर्शवली आहे.