संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे पाचव्यांदा तर शिवसेनेचे संजय राऊत हे चौथ्यांदा राज्यसभेच्या रिंगणात असतील. राज्यातून काँग्रेसच्या सरोज खापर्डे यांनी आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा राज्यसभा सदस्यत्व भूषविले असून, पटेल हे त्यांची बरोबरी करणार आहेत.

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीकरिता शिवसेनेच्या संजय राऊत व संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. राऊत यांनी २००४ पासून १८ वर्षे राज्यसभेची खासदारकी भूषविली आहे. या निवडणुकीत निवडून आल्यावर ते लागोपाठ चौथ्यांदा राज्यसभेचे खासदार होतील. प्रफुल्ल पटेल यांनी लोकसभा व राज्यसभा अशा संसदेच्या उभय सभागृहांचे सदस्यत्वपद भूषविले आहे. पटेल यांची राज्यसभेची ही चौथी खेप होती. पटेल हे २००० ते २००६ या काळात पूर्ण सहा वर्षे राज्यसभेचे सदस्य होते. २००६ मध्ये त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. २००९ मध्ये त्यांची लोकसभेवर निवड झाल्याने राज्यसभा सदस्यत्वपद रद्द झाले. २०१४ मध्ये पोटनिवडणुकीत ते पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले. २०१६ ते २०२२ अशी सहा वर्षे त्यांनी परत खासदारकी भूषविली. आतापर्यंत दोनदा पूर्ण सहा वर्षे तर दोनदा कमी कालावधी त्यांना मिळाला.

सरोज खापर्डे २६ वर्षे राज्यसभेवर 

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय नागपूरच्या सरोज खापर्डे यांनी १९७२ ते २००० या काळात पाच वेळा राज्यसभेची खासदारकी भूषविली. १९७२ ते १९७४ तर १९७६ ते २००० अशी सलग २४ वर्षे त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. राज्यातून सर्वाधिक पाच वेळा त्या राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. प्रफुल्ल पटेल हे आता पाचव्यांदा राज्यसभेवर निवडून येतील. राज्यातील नजमा हेपतुल्ला यांनी सहा वेळा राज्यसभेचे सदस्यत्व भूषविले. पण त्यातील चार वेळा महाराष्ट्रातून , प्रत्येकी एकदा राजस्थान आणि मध्य प्रदेशातून निवडून आल्या आहेत.

चार वेळा खासदारकी भूषविलेले राज्यातील नेते

आबासाहेब कुलकर्णी- (१९६७-७०, १९७० ते १९७६, १९७८-८४, १९८६-९२)

एन. के. पी. साळवे – १९७८-८४, १९८४-९०, १९९०-९६, १९९६ -२००२)

नजमा हेपतुल्ला – १९८०-८६, १९८६-९२, १९९२-९८, १९९८-२००३ (राजीनामा)

सुरेश कलमाडी – १९८२-८८, १९८८-९४, १९९४ (राजीनामा), १९९८-२००४

प्रफुल्ल पटेल – २०००-०६, २००६ -०९, २०१४-२०१६, २०१६-२२

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parful patel from ncp will contest rajya sabha election for the fifth time and sanjay raut from shivdena for the forth time