भंडारा : भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री परिणय फुके यांना उमेदवारी दिली आहे. फुके यापूर्वी भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यावेळी फुके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर समर्थक राजेंद्र जैन यांचा पराभव केला होता. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता महायुतीत सहभागी आहे. यामुळे भविष्यातील मतभेद टाळण्यासाठीच फुके यांना विधानपरिषदेवर पाठवून सुरक्षित करण्यात आल्याचे यावरून दिसून येत आहे.
फुके हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती आणि खंदे समर्थक मानले जातात. २०१६ ते २०२२ या कालावधीत ते भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे जैन, भाजपचे फुके आणि काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल, अशी तिरंगी लढत झाली होती. निवडणुकीच्या दोन दिवसाआधी फडणवीस गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत फिरले आणि विजयाचे गणित बदलले. फुके यांनी जैन यांना पराभूत करून प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का दिला होता.
हेही वाचा – विधानसभेची उमेदवारी गृहीत धरून नरसय्या आडम यांचे ‘व्होट भी-नोट भी’ अभियान सुरू
या विजयानंतर प्रथमच आमदार झालेल्या फुकेंना फडणवीस यांनी राज्यमंत्रिपद दिले. त्यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही सांभाळले. त्यानंतर फुके यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांच्या विरोधात निवडणूक लढली. यात फुकेंचा पराभव झाला. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी फुके इच्छुक होते. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारीस नकार मिळाल्यामुळे फुके नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी विधानपरिषदेची उमेदवारी त्यांना देण्यात आली.
फुके यांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा पहिला कार्यकाळ दीड वर्षांपूर्वीच संपला होता. लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे फुकेंना पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, यामुळे महायुतीत वाद उद्भवण्याची शक्यताही होती. कारण, प्रफुल्ल पटेल आणि राजेंद्र जैन महायुतीत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस या घटकपक्षाचे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील वरिष्ठ नेते समजले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवारीसाठी पटेल आणि जैन आग्रही असतीलच. भविष्यात या जागेवरून महायुतीत वाद उद्भवू नये, यासाठीच फुके यांना विधानपरिषदेवर पाठवून सुरक्षित करण्याची खेळी भाजपने खेळली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.