परळी

छत्रपती संभाजीनगर : परळी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात दंड थोपटण्याची तयारी केलेल्या दोन संभाव्य उमेदवारांनी घेतलेली माघार मुंडेंच्या पथ्यावर पडली. वंजारा समाजाची मतपेढीत विभाजन होण्याचा धोका टळल्याचे चित्र मानले जात असले तरी धनंजय मुंडे यांच्यासमोर ‘शरद पवारांचा मराठा उमेदवार’ आहे. त्यांच्या सभेमुळे विरोधक एकवटल्याचे चित्र दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरील राजेसाहेब देशमुख यांना पवारांनी पक्षात घेऊन धनंजय मुंडेंसमोर उतरवले आहे. देशमुख हे ‘बाहेरचे’ म्हणजे अंबाजोगाई तालुक्यातील असले तरी ते ज्या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले आहेत, तो परळी विधानसभा क्षेत्रात येणारा आणि ६० गावांचा मराठा बहुलपट्टा असल्याने लोकसभेप्रमाणे परळीमध्ये पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षपूर्ण लढतीला धनंजय मुंडेंना सामोरे जावे लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार यांना भाजपकडे नेण्यात धनंजय मुंडे यांचा हात असल्याची वदंता आहे. त्या वदंतेला शरद पवारांनी धनंजय मुंडेंवर विचारलेल्या प्रश्नातूनही दिलेली उद्विग्न प्रतिक्रिया बळ देणारीच मानली जाते. त्यावरून शरद पवार हे परळी मतदारसंघात कोणता उमेदवार देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेर राजेसाहेब देशमुख यांना धनंजय मुंडेंसमोर उभे करण्यात आले आहे. मागील दीड वर्षांपासून मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना राजेसाहेब देशमुख हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी जवळीक साधून होते.

हेही वाचा >>> Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”

सध्या आरक्षण आंदोलनावरून मराठा समाज एकवटलेला आहे. दुसरीकडे ओबीसी समाजातही एकीचे संदेश फिरत असले तरी त्यातील काही घटक परळीतील राजकीय वातावरणावरून नाराज आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात लावलेली हजेरी हा पंकजा यांना २०१९ विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ९२ हजारांच्या संख्येतील मते आपल्याकडे वळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा भाग मानला जातो. शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले वंजारा समाजातील राजेभाऊ फड व अॅड. संजय दौंड यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय गुंडाळल्याने मुंडेंची डोकेदुखी कमी झाली, तरी त्यांच्यापुढे मतदारांमधील महाविकास आघाडीची मतपेढी मानली जात असलेल्या मराठा, दलित व मुस्लीम या तीन घटकांतील दीड लाखांच्या आसपासची मते मिळवण्याचे आव्हानही आहे.

लोकसभेतील राजकीय चित्र

● महायुती १,४१,७७४

● महाविकास आघाडी ६६,९४०

निर्णायक मुद्दे

मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीपासून मराठा विरुद्ध ओबीसी हा राजकीय मुद्दा तापला आहे. मतदारसंघात सरळसरळ जातीय पातळीवर प्रचार होत आहे. या पार्श्वभूमीवर जातीय पातळीवर होणारी लढत ही निर्णायक असेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parli assembly election 2024 dhananjay munde vs rajesaheb deshmukh maharashtra assembly election 2024 print politics news zws