मणिपूरमधील हिंसाचार आणि याच राज्यात दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनांचे पडसाद थेट संसदेतही उमटत आहेत. हा मुद्दा घेऊन विरोधक संसदेत आक्रमक झाले आहेत. महिलांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे अशी विरोधकांची मागणी आहे. आजदेखील (२५ जुलै) संसदेतील अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. यासह वेगवेगळ्या राज्यांच्या विधिमंडळांतही या मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप, निषेध, निदर्शनं पाहायला मिळू शकतात.
आजही अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता
काल (२४ जुलै) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमधील घटनेवर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका स्पष्ट केली. विरोधक मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन सादर करून भूमिका स्पष्ट करावी, अशी विरोधकांची मागणी आहे. हीच मागणी करताना सोमवारी विरोधकांनी राज्यसभा तसेच लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. परिणामी संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी शिस्तभंग म्हणून आप पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्यावर निलंबनाची (पावासाळी अधिवेशनापर्यंत) कारवाई करण्यात आली. ही कारवाई केल्यानंतर विरोधक नरमतील अशी सत्ताधाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र सभागृहात विरोधकांचा आवाज कमी झाला नाही. उलट संजय सिंह यांच्यावरील कारवाईनंतर विरोधकांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ रात्रभर आंदोलन केले. त्यामुळे आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे.
भाजपा आपल्या भूमिकेत बदल करणार नाही?
आज (२५ जुलै) सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीआधीच विरोधकांची एक बैठक होणार आहे. या बैठकीत आजच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांचीदेखील सोमवारी (२४ जुलै) संसद भवनात एक बैठक झाली. या बैठकीत आपल्या रणनीतीत कोणताही बदल न करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांतील हा संघर्ष कायम राहण्याची शक्यता आहे.
मणिपूरच्या मुद्द्यावरून भाजपाच्या मित्रपक्षांची वेगळी भूमिका
मणिपूरच्या मुद्द्यावरून भाजपाच्या काही मित्रपक्षांनीदेखील भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंट हा पक्ष भाजपचा मित्रपक्ष आहे. मात्र या पक्षाचे नेते तथा मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी आम्ही भाजपाच्या सर्वच विचारांशी समहत आहोत, असे नाही, असे स्पष्ट केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून झोरामथांगा यांनी म्यानमारधील निर्वासितांना परत पाठवण्यास नकार दिला आहे. तसेच मिझो नॅशनल फ्रंट हा पक्ष मंगळवारी (२५ जुलै) मणिपूरमधील झो -जातीच्या लोकांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या मोर्चाला आमचा पक्ष पाठिंबा देईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. मणिपूरमध्ये झो आणि बहुसंख्य असलेल्या मैतेई या दोन समाजामध्ये संघर्ष सुरू आहे. मिझोरममधील लोकांचे मणिपूमधील झो समाजाच्या लोकांशी वांशिक संबंध आहेत. त्यामुळे मिझोरममधील प्रदेश भाजपाने या मोर्चाला समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. आज मिझोररमधील भाजपाची सर्व कार्यालये बंद असतील.
राजस्थानमध्ये सभागृहात गदारोळ, आजही वादळी चर्चा
सध्या फक्त संसदेचे पावसाळी अधिवेशनच वादळी ठरत आहे असे नाही. राजस्थान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांतील पावसाळी अधिवेशनांत तेथील स्थानिक मुद्दे तसेच मणिपूरच्या मुद्द्यावून सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मणिपूरमधील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमुळे काँग्रेस भाजपावर टीका करत आहे. तर भाजपा राजस्थान, छत्तीसगड या काँग्रेसशासित राज्यांत महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे, असे म्हणत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.
लाल डायरीमुळे राजस्थानमध्ये घमासान
राजस्थानच्या विधिमंडळात ‘लाल डायरी’च्या मुद्द्यावरून भाजपा विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला आहे. सोमवीर याच मुद्द्यावरून राजस्थानच्या विधिमंडळात चांगलाच गदारोळ झाला. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले राजेंद्र सिंह गुढा यांनी गहलोत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजस्थान पर्यटन विकास मंडामंडळाचे अध्यक्ष धर्मेंद्र राठोड यांच्या घरी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एक लाल रंगाची डायरी सापडली आहे, असा दावा गुढा यांनी केला आहे. छाप्यादरम्यान गहलोत यांनी राठोड यांना डायरी ताब्यात घेण्यासाठी निवासस्थानी जाण्यास सांगितले होते. राठोड यांनी लिहिलेल्या डायरीत अनियमित आर्थिक व्यवहार आणि मुख्यमंत्री तसेच त्यांच्या मुलाची नावे आहेत, असा दावा गुढा यांनी केला आहे. याच कारणामुळे राजस्थानचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत आहे.
पश्चिम बंगालमध्ये मणिपूरच्या मुद्द्यावरून सत्ताधारी- विरोधक आमनेसामने
गुढा यांनी लोकांत जाऊन डायरीतील सत्य सांगण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आजदेखील (२५ जुलै) राजस्थानच्या विधिमंडळात घमासान पाहायला मिळू शकते. पश्चिम बंगालमध्येही मणिपूरच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी सरकार आणि भाजपा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. मणिपूरच्या घटनेचा निषेध म्हणून ममता बॅनर्जी सरकार आज (२५ जुलै) पश्चिम बंगालच्या विधिमंडळात मणिपूरच्या परिस्थितीवर भाष्य करणारा ठराव मंजूर करण्याची शक्यता आहे. सोमवारी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत असा ठराव मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीवर भाजपाने बहिष्कार टाकला होता.