पंतप्रधानांचे गृहराज्य गुजरातमध्ये जातीय वादावरून भाजपा अडचणीत आली आहे. गुजरात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राजकोट लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. पाटीदार समाजातून आलेले पुरुषोत्तम रूपाला केंद्रातील मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्री आहेत. त्यांना ५ मार्च रोजी गुजरातमधील राजकोट येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थक, खासदार मोहन कुंडारिया यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

परंतु, एका प्रचार सभेदरम्यान रूपाला यांनी केलेल्या वक्तव्याने मोठ्या वादाचे रूप घेतले आहे. गुजरातमध्ये क्षत्रिय किंवा राजपूत समाजाची संख्या लक्षणीय आहे. बऱ्याच काळापासून भाजपालादेखील या समाजाचा पाठिंबा मिळत आला आहे आणि याच समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने रूपाला यांना विरोध होत आहे. लोकसभा निवडणूक जवळ आली असताना दिवसेंदिवस हा विरोध वाढत असल्याने, भाजपाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Solapur guardian minister marathi news
सोलापूरसाठी स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मिळण्याची अपेक्षा
The BJP has promised to accommodate the concerns of alliance partners both in terms of representations and other important portfolios
Home Ministry : गृहखातं देण्यास भाजपाचा नकार; शिवसेनेला ‘या’ खात्यांचा दिला पर्याय!

नेमका वाद काय?

२३ मार्चला माध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओत पुरुषोत्तम रूपाला २२ मार्चला राजकोटमध्ये आयोजित एका दलित कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत; ज्यात ते कथितपणे म्हणाले, “इतरांनीही आमच्यावर राज्य केले, ब्रिटिशांनीही केले. त्यांनीही आमचा छळ केला. ते (राजे) त्यांच्यासमोर नतमस्तक झाले आणि त्यांची भाकरीही खाल्ली. त्यांच्याशी त्यांच्या (राजा) मुलींचे लग्न लावले; पण आमच्या रुखी (दलित) समाजाने ना धर्म बदलला ना असे संबंध प्रस्थापित केले, तरीही त्यांचा सर्वाधिक छळ झाला.”

या विषयावर क्षत्रिय समाजाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. विविध क्षत्रिय संघटनांनी, विशेषत: राज शेखावत यांच्या नेतृत्वाखालील क्षत्रिय करणी सेना आक्रमक झाली आहे. ते म्हणाले, क्षत्रिय राज्यकर्त्यांनी त्यांच्या मुलींची लग्ने ब्रिटिशांशी लावल्याचे रूपाला यांचे विधान चुकीचे आहे. काही निदर्शक गटांनी राज्याच्या विविध भागांत रूपाला यांचे पुतळेही जाळले. सध्या राज्यसभेचे खासदार असलेले पुरुषोत्तम रूपाला हे उच्चवर्णीय पाटीदार समाजाचे आहेत.

रूपाला यांच्या वादग्रस्त विधानावर क्षत्रीय समाजाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

रूपाला यांच्याविरोधात तीव्र आंदोलन

रूपाला यांच्याविरोधात निदर्शने करणाऱ्या प्रमुख क्षत्रिय चेहऱ्यांमध्ये अखिल गुजरात राजपूत युवा संघाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पी. टी. जडेजा, महिला करणी सेना गुजरातच्या अध्यक्ष पद्मिनीबा वाला, क्षत्रिय करणी सेनेचे प्रमुख राज शेखावत व करणी सेना गुजरातचे अध्यक्ष जे. पी. जडेजा यांचा समावेश आहे.

राज शेखावत यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अमरेली पोलिसांनी हिस्ट्री शीटर अशोक बोरीचा यांना अटक केल्यानंतर २०२१ मध्ये अमरेलीचे तत्कालीन एसपी निर्लिप्त राय यांना धमकावल्याप्रकरणी शेखावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. २०१९ मध्ये, कच्छमध्ये एका भाषणात दलितांना लक्ष्य केल्याबद्दलही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी शेखावत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

राजकोटच्या रहिवासी पद्मिनीबा वाला यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पी. टी. जडेजा आणि जे. पी. जडेजादेखील राजकोटचे रहिवासी आहेत. रूपाला यांना दिलेली उमेदवारी भाजपाने मागे घ्यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. शेखावत यांनी निषेध म्हणून भाजपाचा राजीनामा दिला आहे.

रूपाला यांची प्रतिक्रिया

हा वाद उफाळून येताच रूपाला यांनी एक व्हिडीओ-स्टेटमेंट जारी करून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. “माझा हेतू इतर धर्मीयांनी आपल्या संस्कृती आणि आपल्या देशावर केलेल्या अत्याचारांची जाणीव करून देण्याचा होता; राजघराण्यांना किंवा क्षत्रिय समाजाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, आताही नाही किंवा भविष्यातही नसेल. तरीही, माझ्या भाषणामुळे किंवा व्हिडीओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मनापासून माफी मागतो. मी हे निवडणुकीसाठी नाही तर क्षत्रिय समाजाच्या गौरवाचा आदर करतो म्हणून करत आहे,” असे ते म्हणाले.

प्रकरण शांत करण्याचे प्रयत्न

राजकोट जिल्ह्यातील गोंडल विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे माजी आमदार आणि क्षत्रिय नेते जयराजसिंह जडेजा यांनी वांकानेरच्या तत्कालीन राजघराण्याचे वंशज केसरीदेव सिंह यांच्यासह सौराष्ट्रातील काही प्रमुख क्षत्रिय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपाचे राज्यसभा खासदार, लिंबडीचे आमदार किरीटसिंह राणा, प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष महेंद्रसिंह सरवैय्या आणि राजकोटचे उपमहापौर सुरेंद्रसिंह वाला यांचा समावेश होता. बैठकीच्या शेवटी रूपाला यांनी उपस्थितांची पुन्हा माफी मागितली.

“माझ्या तोंडातून असे शब्द निघाले त्याबद्दल मला खेद आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी काही बोललो आणि त्यानंतर ते विधान मागे घेतले, असे कधीही झाले नाही; पण हे निवडणुकीच्या वेळी घडले आणि तेही एका कार्यक्रमात. दिवसभराचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मी करशन सगाठिया यांची भजने ऐकण्यासाठी तिथे गेलो होतो. त्या कार्यक्रमात माझ्या वक्तव्यामुळे आज माझ्या पक्षाला त्रास होत आहे, यापेक्षा वेदनादायक काहीही असू शकत नाही. हात जोडून मी माझ्यासाठी नाही तर माझ्यामुळे माझ्या पक्षाला त्रास सहन करावा लागला त्याबद्दल या समाजाची माफी मागतो”, असे रूपाला म्हणाले.

क्षत्रिय समुदाय

क्षत्रिय हा जमिनीची मालकी असलेला समुदाय आहे. या समुदायातील अनेकांनी गुजरातमधील बहुतेक संस्थानांवर राज्य केले आहे. राज्याच्या मतदारांपैकी सुमारे सात टक्के मतदार या समुदायाचे आहेत. ऐतिहासिक कारणांमुळे गुजरातच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव आहे. गोंडलच्या सभेत जयराज सिंह यांनी सांगितले की, गोंडल विधानसभेच्या जागेवर क्षत्रिय मतदारांची संख्या फक्त आठ हजार आहे; परंतु पट्ट्यांवर वर्चस्व असलेल्या पाटीदारांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी ही जागा अनेक वेळा जिंकली आहे.

सुमारे दोन दशकांपूर्वी भावनगरमध्ये क्षत्रिय भाजपा नेते काशीराम राणा यांचे प्रतिनिधित्व होते. क्षत्रिय समाजाचे शक्तीसिंह गोहिल हे सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. काही निरीक्षकांचे म्हणणे आहे की, रूपाला यांच्या वक्तव्यामुळे राज्यात क्षत्रिय आणि पाटीदार यांच्यातील जातीय मतभेद पुन्हा निर्माण झाला आहे. १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या सुरुवातीस, १८ टक्के मतदार असलेल्या पाटीदारांनी समाजातील आणि राजकारणातील क्षत्रिय वर्चस्वाला आव्हान दिले. विशेषत: काँग्रेसने KHAM (क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लीम) फळी जिंकल्यानंतर. त्यामुळे पाटीदारांना भाजपाकडे वळावे लागले. शेवटी १९९५ मध्ये समाजाने पहिल्यांदा पक्षाला सत्तेवर आणले. तेव्हापासून पाटीदार हा राज्यातील सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली समुदाय म्हणून उदयास आला. या समुदायाचे सरकार तसेच पक्षावर वर्चस्व आहे.

काँग्रेस आक्रमक

राजेशाही वंशाचे काँग्रेस नेते आदित्यसिंह गोहिल यांनी २८ मार्चला रूपाला यांच्याविरोधात मॅजिस्ट्रेट कोर्टात मानहानीची तक्रार दाखल केली आणि असे म्हटले की, त्यांच्या वक्तव्यामुळे क्षत्रिय समाजाचा सदस्य म्हणून त्यांची प्रतिष्ठा कलंकित झाली. प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आदित्यसिंह यांनी दावा केला की, ही तक्रार त्यांनी स्वतः दाखल केली आहे.

रूपाला यांनी जाहीर माफी मागितल्याच्या एका दिवसानंतर, जुनागडमधील दलित आणि काँग्रेस कार्यकर्ता अजय वनवी यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आणि आरोप केला, “त्यांनी (रूपाला) सांगितले की, राजकोटमध्ये दलितांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा त्यांना काहीही उपयोग झाला नाही. ते या कार्यक्रमात सहज गेले होते. यावरून त्यांची दलितांप्रति असलेली मानसिकता दिसून येते. त्यांनी दलितांचा अपमान केला आहे, त्यामुळे आरोपींवर विविध कलमांखाली (प्रतिबंधक) गुन्हा नोंदवावा, अशी माझी मागणी आहे.”

हेही वाचा : बिहारमध्ये माय-बाप ठरणार वरचढ, की एनडीएची सरशी?

भाजपाच्या अडचणींत वाढ

रूपाला यांनी माफी मागितल्यानंतरही हा वाद शांत झाला नाही. सुरेंद्रनगरमध्ये रविवारी झालेल्या क्षत्रियांच्या बैठकीत समाजाच्या नेत्यांनी रूपाला यांना कोणतीही निवडणूक सभा करू देऊ नका, असे आवाहन केले. राजकोटमध्ये शनिवारी संध्याकाळी रूपाला यांचा पुतळा जाळल्याबद्दल क्षत्रिय समुदायातील काहींना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिस ठाण्यामध्ये गर्दी झाली. मात्र, भाजपा या आंदोलनावर मौन बाळगून आहे. भूपेंद्रसिंह चुडासामा, आय. के. जडेजा आणि प्रदीपसिंह जडेजा यांच्यासह क्षत्रिय समाजातील वरिष्ठ भाजपा नेत्यांनी रूपाला यांना स्पष्ट विरोध केला आहे. भाजपातील एक भाग रूपाला यांच्या उमेदवारीच्या विरोधात आहे; ज्यामुळे रूपाला यांच्यासाठी गोष्टी अधिक अवघड झाल्या आहेत.

Story img Loader