काँग्रेस नेते राहूल गांधी कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. साडेतीन हजार किलोमीटरच्या या यात्रेसाठी देशभरातील १२० कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. यात रायगड जिल्ह्यातील नंदा म्हात्रे यांचाही समावेश आहे. या पदयात्रेतून भारत समजून घेण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- सुषमा अंधारेंच्या जळगाव दौऱ्यातून प्रबोधन कमी, विरोधकांना धडकीच अधिक

कन्याकुमारीपासून निघालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या चार राज्यांचा प्रवास करत तेलंगणात पोहोचली असून ती आता महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. ५४ दिवसांत १३०० किलोमीटरचा टप्पा यात्रेनी पूर्ण केला आहे. दररोज यात्रेत हजारो कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत असले तरी कन्याकुमारी ते काश्मीर या संपूर्ण भारत यात्रेत केवळ १२० निवडक कार्यकर्त्यांच्या समावेश आहे. जे राहुल गांधी यांच्या समवेत ही संपूर्ण यात्रा पूर्ण करणार आहेत. यात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नंदा म्हात्रे यांचाही समावेश आहे. देशभरातील ५० हजार कार्यकर्त्यांमधून त्यांची या पदयात्रेसाठी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या त्या राज्य समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. पेण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यापूर्वी निवडणूक लढवली आहे.

कन्याकुमारीहून निघालेली ही यात्रा सध्या चार राज्यांचा दौरा करून तेलंगणात दाखल झाली आहे, ५४ दिवसांत १ हजार ३०० किलोमीटरचा टप्पा राहूल गांधी यांच्या या भारत जोडो यात्रेनी पुर्ण केला आहे. यात्रेचा हा अनुभव समृध्द करणारा आहे. भारत समजून घेण्याची संधी यामुळे मिळत आहे. दररोज नवनवीन लोक भेटत आहेत. त्यांचे प्रश्न मांडत आहेत. त्यांचे प्रेम आणि पाठिंबा व्यक्त करत आहेत. हे खूप भारावून टाकणारे असल्याचे नंदा म्हात्रे सांगतात.

हेही वचा- पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सोमवारी सर्वसाधारण सभेत रंगीत तालीम

दोन मुलींना सोडून पाच महिने घरापासून लांब राहण्याचा निर्णय सोपा नव्हता. पण दोन्ही मुलींनी आणि पतीने मला ही संधी सोडू नको असे सांगितले. घरातील सर्व जबाबदारी त्यांनी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे यात्रेत सहभागी होता आले. सुरवातीचे काही दिवस कठीण गेले. पायात क्रॅम्प येत, पायाला फोडे येणे, चालताना त्रास होणे असे प्रकार होत होते. पण नंतर सवय होत गेली.

रोज सकाळी सव्वा पाच वाजता आमचा दिवस सुरू होतो. नाश्ता आणि ध्वजवंदन करून चालायला सुरुवात करतो. संध्याकाळी कॅम्प जिथे असेल तिथे वास्तव्याला येतो. तेथे ७० कन्टेनरमध्ये आमच्या १२० जणांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर जेवणाची व्यवस्था तंबूत करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. राहुल गांधी हे सुद्धा याच कंन्टेनर हाऊसमध्ये वास्तव्य करत आहेत.

हेही वाचा- वन क्षेत्रात राहुल गांधींच्या ‘पदयात्रे’चा मोटारीने प्रवास, सुरक्षा व पर्यावरणाची हानी टाळण्याचा मुद्दा

अनेक सामाजिक संस्थाही या यात्रेशी आता जोडल्या गेल्या आहेत. कन्हैया कुमार, योगेंद्र यादव आदी यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे भारत जोडो यात्रा काँग्रेसपुरती मर्यादित राहिलेली नाही, ती खऱ्या अर्थाने लोक, समाज आणि विविध घटकांना जोडणारी झाली आहे. या यात्रेचा मी एक भाग आहे याचा मला आनंद आहे, असेही नंदा म्हात्रे सांगत आहेत. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Participation of nanda mhatre of raigad in rahul gandhis bharat jodo yatra print politics news dpj