जालना : परतूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीमधील उमेदवारी काँग्रेसऐवजी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आसाराम बोराडे यांना जाहीर झाली आहे. परतूरमधून काँग्रेसकडून सुरेशकुमार जेथलिया यावेळेसही इच्छुक होते. परंतु जिल्ह्यात शिवसेनेस (उद्धव ठाकरे) एक तरी जागा देण्याच्या विचारातून जेथलिया यांचे नाव मागे पडले.
जेथलिया यापूर्वी सहा वर्षे विधान परिषदेवर राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे २००९ मध्ये परतूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडून आले होते. स्थानिक नगर परिषदेच्या राजकारणातून पुढे आलेले जेथलिया जिल्हा काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते आहेत. ३५-४० वर्षे परतूर नगर परिषद अधिपत्याखाली ठेवणारे जेथलिया यांनी यापूर्वी तीन वेळेस भाजपचे बबनराव लोणीकर यांच्याशी लढत दिलेली आहे. जिल्ह्यातील पाच पैकी जालना आणि परतूर हे दोन्ही विधानसभा मतदार संघ आतापर्यंत काँग्रेसचे परंपरागत मतदार संघ राहात आलेले आहेत. यावेळेस बदलत्या राजकीय समीकरणात काँग्रेसच्या सोबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष आलेला आहे. या पक्षास जिल्ह्यातील एक तरी जागा देण्याच्या विचारातून परतूरमधून काँग्रेस पक्ष बाजूला पडला आहे. त्यामुळे जेथलियांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकलेली नाही.
कैलास गोरंट्याल यांना पाचव्यांदा उमेदवारी
जालना मतदार संगातून काँग्रेसने पाचव्यांदा कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघात यापूर्वी चार वेळेस गोरंट्याल आणि शिवसेनेचे (शिंदे) अर्जुन खोतकर यांच्यात लढत झालेली आहे. आता पाचव्यांदा हे दोन्ही उमेदवार परस्परांच्या विरोधात असणार आहेत.